मुंबई - पुणे पदवीधर मतदारसंघाच्या २०२० मध्ये झालेल्या निवडणुकीत विजयी झालेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार आमदार अरुण लाड यांना मुंबई उच्च न्यायालयानं दिलासा दिला आहे. या निवडणुकीत लाड यांच्याविरोधात उभे राहिलेले आणि पराभूत झालेले भाजपाचे उमेदवार संग्राम देशमुख यांची याचिका उच्च न्यायालयानं फेटाळून लावली आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मिलींद जाधव यांनी याबाबत निर्णय दिला.
पुणे पदवीधर मतदारसंघाचे आमदार अरुण लाड यांना उच्च न्यायालयाचा दिलासा, पराभूत उमेदवार संग्राम देशमुख यांची याचिका फेटाळली - MLA ARUN LAD
मुंबई उच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयानं आमदार अरुण लाड यांना दिलासा मिळाला आहे. उच्च न्यायालयानं पराभूत उमेदवार संग्राम देशमुख यांची याचिका फेटाळली आहे.
Published : Jan 4, 2025, 10:15 PM IST
लाड यांच्यातर्फे देखील आक्षेप -पुणे विभाग पदवीधर मतदारसंघाची १ डिसेंबर २०२० रोजी निवडणूक झाली होती. तसंच ४ डिसेंबर रोजी या निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात आला होता. या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अरुण लाड विजयी झाले होते. तर भाजपाचे संग्राम देशमुख पराभूत झाले होते. देशमुख यांनी १८ जानेवारी २०२१ रोजी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. विजयी झालेल्या अरुण लाड यांना १ लाख २२ हजार १४५ मते मिळाली होती. पराभूत झालेल्या संग्राम देशमुख यांना ७३ हजार ३२१ मते मिळाली होती. या वाढलेल्या मतांमुळे विजयी होण्याचा दावा याचिकेत करण्यात आला होता. या याचिकेवर अरुण लाड यांच्यातर्फे देखील आक्षेप घेण्यात आला होता.
संशय निरर्थक असल्याचं निरीक्षण -दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायमूर्ती मिलींद जाधव यांनी याचिकादारांची ही याचिका अपुऱ्या तथ्यांवर आधारित असल्याची आणि अयोग्य असल्याचं मत व्यक्त केलं. शेवटच्या टप्प्यात झालेल्या मतदानावर देशमुख यांनी घेतलेला संशय निरर्थक असल्याचं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं आणि ही याचिका फेटाळून लावली. तब्बल चार वर्षांनतर या प्रकरणाचा निकाल लागला आहे. या निकालामुळे अरुण लाड यांना मोठा दिलासा मिळाला आहे.