छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद)heavy Rain in Marathwada -सोमवारी जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे कन्नड तालुक्यातील घाट शेंद्रा येथील पुराच्या पाण्यात एक 18 महिन्याचा चिमुकला वाहून गेल्याची घटना घडली. काही वेळानंतर चिमुकल्याचा मृतदेह एका लिंबाच्या झाडात अडकलेला आढळून आला. साई कडूबा बोरसे असे मृत मुलाचं नाव आहे. त्यांचे संपूर्ण कुटुंब शेतात राहते. मात्र दुपारच्या वेळी अचानक झालेल्या जोरदार पावसामुळे त्यांच्या परिसरात पाणी शिरले. त्यावेळी साई हा घरात दिसत नसल्यानं कुटुंबीयांनी शोधाशोध केली. त्यानंतर हा चिमुकला नाल्याच्या पुरात वाहून गेला असल्याची माहिती मिळाली.
बाळ गेले वाहून-कन्नड तालुक्यातील घाट शेंद्रा परिसरात पहिल्यांदाच ढगफुटी सारखा पाऊस झाला. तेथील नदी नाले ओसंडून वाहत होते. त्यावेळी तिचे राहणाऱ्या कडूबा बोरसे यांचा मुलगा साई पाण्यात वाहून जाऊन त्याचा मृत्यू झाला. कडूबा यांच्या घराजवळ ओढा आहे. ओढा ओसंडून वाहत असताना त्यांचा दीड वर्षाचा मुलगा साई हा घरात खेळत होता. आई स्वयंपाक करत होती. तर वडील घराबाहेर काम करत होते. त्याचवेळी साई घरात नसल्याचं त्याच्या आईला लक्षात आले. तिने कुटुंबीयांना याबाबत सांगितले असता सर्वांनी चिमुकल्याचा शोध घेतला. मात्र, तो आढळून आला नाही. तो पाण्यात पाहून गेल्याची भीती त्यांना वाटली. त्याबाबत त्यांनी तसा शोध सुरू केला असता सायंकाळच्या सुमारास चिमुकल्याचा मृतदेह एका लिंबाच्या झाडात अडकलेला आढळून आला. या घटनेनं कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककळा पसरली आहे. या प्रकरणी कन्नड पोलिसात आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे.
मराठवाड्यात 8 जणांचा मृत्यू -छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यात सलग दोन दिवस पावसानं हाहाकार केला. मुसळधार झालेल्या पावसामुळे सर्वच ठिकाणी छोटे-मोठे नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत. मोठ्या नद्यादेखील दुथडीवरून वाहू लागल्यानं अनेक प्रकल्प तुडुंब भरले आहेत. मराठवाड्यात पावसामुळे 8 जणांचा मृत्यू झालाय. तर अनेक शेतकऱ्यांची पिक देखील वाहून गेल्याने मोठे नुकसान होऊन अनेक गावांचा संपर्क तुटलाय. मराठवाड्यातील 483 पैकी जवळपास 284 मंडळात या पावसाचा फटका बसल्याने अतिवृष्टी झाली. परभणी जिल्ह्यातील पाथरी मध्ये सर्वाधिक 314 मिलिमीटर पाऊस पडलाय. दरम्यान मराठवाड्यातील अनेक ठिकाणी या पावसामुळे दाणादाण उडाली आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना आणि परभणी जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.