कोल्हापूर Panchganga River Flood : गेल्या आठवड्याभरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळं कोल्हापूर जिल्ह्याला यंदाही महापुराचा फटका बसण्याची शक्यता निर्माण झालीय. राधानगरी धरणाचे 4 स्वयंचलित दरवाजे अद्यापही खुले असल्यानं पंचगंगा नदीची पाणीपातळी संथ गतीनं वाढत आहे. त्यामुळं जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील दूधगंगा, वेदगंगा, कुंभी, कासारी, भोगावती नदीकाठच्या पूरग्रस्तांसह प्रयाग चिखली आणि आंबेवाडी गावातील 5 हजार 800 नागरिकांना एनडीआरएफ आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीनं सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आलंय. तसंच नागरिकांनी सतर्क रहावं, असं आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडून करण्यात आलंय.
राधानगरी धरणातून 7 हजार 168 क्युसेक विसर्ग : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 8.36 टीएमसी पाणीसाठा आहे. धरणाचे 4 स्वयंचलित दरवाजे खुले असून सध्या धरणातून 7 हजार 168 क्युसेक पाण्याचा विसर्ग भोगावती नदीपात्रात सुरु आहे. त्यामुळं पंचगंगा नदीची राजाराम बंधाऱ्यावरील पाणीपातळी 47 फूटांवर पोहोचली आहे. तर कोल्हापूर शहरातील अनेक सखल भागात पाणी शिरण्याला सुरुवात झाली असून शहरातील बापट कॅम्प, शाहूपुरी कुंभार गल्ली, जयंती नाला परिसर, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर या भागात पाणी गुडघ्यापर्यंत पोहोचलंय.
228 नागरिकांचं स्थलांतर : पंचगंगा नदीनं धोका पातळी ओलांडली आहे. त्यामुळं महानगरपालिकेची सर्व यंत्रणा रात्रंदिवस काम करत असून पूर बाधित क्षेत्रातील पंचगंगा तालीम, सुतारवाडा, सीता कॉलनी, शाहूपुरी, बापट कॅम्प या परिसरातील 228 नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलंय. यामध्ये 56 कुटुंबातील 116 पुरुष, 112 महिला आणि 41 मुलांचा समावेश आहे. तर शुक्रवारी (26 जुलै) महापालिकेच्या निवारा केंद्रात 31 कुटुंबातील 52 पुरुष, 53 महिला आणि 14 मुलं अशा 105 नागरिकांचं स्थलांतर सायंकाळी 6 वाजेपर्यंत करण्यात आलं. या सर्व निवारा केंद्रातील स्थलांतरित कुटुंबांसाठी महापालिकेच्यावतीनं नाष्टा, चहा आणि जेवणाची व्यवस्था करण्यात आलीय. तसंच महापालिकेच्या आरोग्य विभागाच्यावतीनं वैद्यकीय टिम दैनंदिन तीन वेळा याठिकाणी येऊन नागरिकांची तपासणी करुन त्यांना मोफत औषधं देत आहे.