सातारा - पुणे-बंगळुरू महामार्गावरील कराडजवळच्या मलकापूर हद्दीत शस्त्राच्या धाकाने कारमधील पाच कोटींची रक्कम लुटल्याची घटना मंगळवारी पहाटे साडे पाचच्या सुमारास घडली. सदरची रक्कम ही व्यापाऱ्याची असून ती मुंबईहून दक्षिण भारतात हवाला मार्फत नेली जात होती, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेमुळे सातारा जिल्ह्यात एकाच खळबळ उडाली असून पोलिसांनी संशयितांची धरपकड सुरू केली आहे.
पिस्तुलांसह धारधार शस्त्रांच्या धाकाने रक्कम लुटली :हवाला मार्फत पैसे पोचविणाऱ्या कंपनीचा कारभार दक्षिण भारतातील एका मोठ्या शहरातून चालतो. संबंधित कंपनीची कार सुमारे पाच कोटींची रक्कम घेऊन सोमवारी रात्री मुंबईहून दक्षिण भारतात निघाली होती. मंगळवारी पहाटे पाचच्या सुमारास कार कराडमध्ये आल्यानंतर मलकापूर हद्दीत कारला दुसरे वाहन आडवे मारून कार अडविण्यात आली. यावेळी पाच ते सहा जणांनी पिस्तुलांसह धारदार शस्त्रांच्या धाकाने कारमधील पाच कोटींची रक्कम लुटून पलायन केले.