मुंबई CM Eknath Shinde : गुरुपौर्णिमेनिमित्तानं सर्वजण आपल्या गुरुला वंदन करत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केलं. "बाळासाहेबांच्या आशीर्वादामुळं तळागाळातील सामान्य कार्यकर्ता आमदार, खासदार, मंत्री झाला. बाळासाहेबांना अभिप्रेत असलेलं काम आणि बाळासाहेबांचे विचार आम्ही पुढे नेत आहोत. बाळासाहेबांच्या आणि आनंद दिघे साहेबांच्या पावलावर पाऊल ठेवून नाही तर, त्यांच्या पावलावर जीव ठेवून आम्ही मार्गक्रमण करत आहोत," असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर जाऊन अभिवादन केलं.
मुंबईकर मोकळा श्वास घेणार : "हे सरकार सर्वसामान्यांचं आहे. मागील दोन वर्षात सरकारनं विकासाची अनेक कामे केली आहेत. पायाभूत सुविधांचीही कामं केली. यामध्ये अनेक प्रकल्प आहेत. अटल सेतू, समृद्धी महामार्ग, मेट्रो, कोस्टल रोड आदी प्रकल्प मागील दोन वर्षात या सरकारनं पूर्ण केले आहेत," असे मुख्यमंत्री म्हणाले. "बाळासाहेब नेहमी म्हणायचे मोठमोठ्या इमारती, रस्ते होतील पण लोकांना विरंगुळा घेण्यासाठी उद्यानं झाली पाहिजेत. मला सांगायला आनंद होतोय की, मुंबईतील महालक्ष्मी येथे 120 एकर जमीन सेंट्रल पार्कसाठी घेतली आहे. तर कोस्टल रोडच्या बाजूला 180 एकर जमीन आहे. असे दोन्ही मिळून 300 एकरवर मुंबईकरांसाठी सेंट्रल पार्क होत आहे. त्यामुळं आता मुंबईकरांना मोकळा श्वास घेता येणार आहे. हे सेट्रल पार्क मुंबईकरांसाठी ऑक्सिजन ठरणार आहे. म्हणजे बाळासाहेबांना अभिप्रेत असणारे काम आम्ही करतोय," असं मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितलं.
सरकारचे ऐतिहासिक निर्णय : पुढे बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "सर्वसामान्य माणसाच्या जीवनात बदल व्हावा म्हणून आम्ही 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजना आणली. तसेच गरीब कुटुंबातील पालकांना आपल्या मुलीला उच्च शिक्षण देता येत नव्हते. पण आम्ही एक ऐतिहासिक निर्णय घेतलाय की, मुलींसाठी उच्च शिक्षण मोफत केले आहे. तसेच तीन गॅसही मोफत देतोय. बाळासाहेब नेहमी म्हणायचे की, नोकऱ्या देणारे हात निर्माण करा. त्यामुळं आता आम्ही बारावी, डिप्लोमा आणि पदवीधर यांच्यासाठी स्टायफंड देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांसाठी आज अनेक योजना आणल्या आहेत. या सर्व योजना बाळासाहेबांना अभिप्रेत होत्या. या सर्व योजना सरकारने आणलेला आहेत."