नागपूर :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (9 ऑक्टोबर) नागपूर विमानतळाच्या नवीन टर्मिनलचं ऑनलाइन पद्धतीनं भूमिपूजन केलं. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह नागपूर शहरातील भारतीय जनता पक्षाचे आजी-माजी आमदार आणि नेते उपस्थित होते. यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. हरियाणा आणि जम्मू काश्मीरच्या निवडणुकीत काँग्रेसच्या अर्बन नक्षल टोळीनं फेक नेरेटिव्हचा प्रयोग केला. मात्र, हरियाणाच्या जनतेनं त्यांना त्यांची जागा दाखवून दिल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं.
सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिल्यामुळं नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या दुसऱ्या धावपट्टीचा मार्ग अडलेला होता. काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती रद्द केल्यानं नव्या धावपट्टीचा मार्ग मोकळा झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज या नवीन विमानतळाचं भूमिपूजन करण्यात आलं. नवीन विमानतळाच्या उभारणीसाठी सुमारे 7 हजार कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. यात नवीन धावपट्टी, नवीन टर्मिनल इमारत, आधुनिक लाउंज आणि पार्किंगची सुविधा असेल. बांधकाम पूर्ण झाल्यानंतर या विमानतळावरून दरवर्षी दीड कोटी प्रवासी प्रवास करू शकतील.
महाराष्ट्राच्या सर्वांगिण विकासासाठी प्रयत्न :महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी गेल्या 10 वर्षांपासून सुरू केलेल्या प्रयत्नांमुळं अनेक पायाभूत सुविधांसह विकासाचे नवे समृद्ध मार्ग खुले झाले आहेत. महाराष्ट्रातील 10 वैद्यकीय महाविद्यालयांचे उद्घाटन होत आहे. विदर्भाच्या एकात्मिक विकासाला चालना देणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विविध विकास कामांची पायाभरणी होत आहे. शिर्डी विमानतळाच्या एकात्मिक टर्मिनल इमारतीची पायाभरणी, इंडियन इन्स्टीट्युट ऑफ स्किल्स मुंबई आणि विद्या समीक्षा केंद्राचा शुभारंभ होताना मला आनंद होत आहे. ही स्वस्थ आणि समृद्ध महाराष्ट्राची पायाभरणी असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं.
महाराष्ट्रात विकासकामांची पायाभरणी :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विविध विकास कामांचं आणि टर्मिनल इमारतीचं आज भूमिपूजन करण्यात आलं. राज्यभरात 10 नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांचा शुभारंभही करण्यात आला. तसंच 10 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना मान्यता देण्यात आली, त्यामुळं एमबीबीएस अभ्यासक्रमात 900 जागांची वाढ होणार. तर शिर्डी येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाचं नवीन टर्मिनल इमारतीची पायाभरणी करण्यात आली.
काँग्रेस विकास विरोधी पक्ष :महाराष्ट्राचा ज्या वेगानं विकास होतोय, त्याही पेक्षा अधिक वेगानं काँग्रेसच्या काळात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलाय. "काँग्रेस हा बेजबाबदार पक्ष असल्याचं अनेकवेळा सिद्ध झालं असून, खोटी विधानं करून ते जनतेची दिशाभूल करत करतात. काँग्रेस समाजातील लोकांना घाबरवून राजकारण करत आहे. एका जातीचं दुसऱ्या जातीसोबत भांडण लावायचं काम करत काँग्रेस राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करत आहे," असा घणाघात मोदींनी केला.