मुंबई Ganesh Visarjan 2024 :मुंबईत मंगळवारी भाविकांनी आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देत विसर्जन केलं आहे. मुंबईतील गिरगाव चौपाटीवर गणेशमूर्ती विसर्जनासाठी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळली. मुंबईकर आपल्या लाडक्या बाप्पाचं शेवटचं रूप डोळ्यात साठवण्यासाठी गिरगाव चौपाटी इथं मोठ्या प्रमाणात दाखल झाले. अशातच मुंबईचा प्रतिष्ठित बाप्पा पैकी लालबाग गणेश गल्ली येथील मुंबईचा राजा हा देखील गिरगाव चौपाटी इथं दाखल झाला. त्यानंतर भाविकांनी मोठ्या भक्तीभावानं मुंबईचा राजाचं विसर्जन केलं. आतापर्यंत मुंबईतील प्रतिष्ठित अशा मानाच्या गणपतींपैकी मुंबईचा राजा, तेजूकाया गणेश, कामाठीपुरा गल्लीतील गणपती, अंजिरवाडी, खेतवाडी येथील गणपती बाप्पाचं विसर्जन करण्यात आलं. यासोबतच आतापर्यंत 19,176 गणपती विसर्जन झाल्याची माहिती महापालिकेनं दिली आहे.
गिरगाव चौपाटीवर भाविकांनी दिला लाडक्या बाप्पाला निरोप :मुंबईत लालबाग इथल्या गणेश गल्लीतील मुंबईचा राजा, लालबागचा राजा आणि चिंचपोकळीचा चिंतामणी हे तीन प्रसिद्ध गणपती आहेत. मागील दहा दिवसात ज्या भाविकांना मुंबईच्या राजाचं दर्शन घेता आलं नाही, अशा सर्व मुंबईकरांची आज गिरगाव चौपाटी इथं गर्दी जमलेली पाहायला मिळाली. मुंबईचा राजाच्या विसर्जन मिरवणुकीत कार्यकर्त्यांनी मानवी साखळी करून गणपती बाप्पाभोवती एक मोठा घेरा केला. या विसर्जन मिरवणुकीत मुंबईकरांचा उत्साह पाहायला मिळाला.