सांगली Ganpati In Mosque : 'वाळवा' तालुका हा अत्यंत सधन तालुका म्हणून ओळखला जातो. या तालुक्यातले गोटखिंडी गाव हिंदू-मुस्लिम ऐक्याचं प्रतीक म्हणून ओळखले जाते. कारण या ठिकाणी हिंदू-मुस्लिम बांधव एकत्र येऊन केवळ गणेशोत्सव (Ganeshotsav 2024) साजरा करत नाहीत, तर मशिदीमध्ये गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना देखील करतात.
44 वर्षांपासूनची परंपरा :गावातल्या झुंजार चौक येथे असणाऱ्या मुस्लिम समाजातच्या मशिदीत गेल्या 44 वर्षांपासून गणेशाची मूर्ती विराजमान करून नऊ दिवस पूजा केली जाते. गणेश आगमनाची आणि विसर्जनाची मिरवणूक तसेच आरती या सर्वांमध्येच मुस्लिम बांधव सहभागी होतात. गणेशोत्सव सुरू होताच या ठिकाणी मंडप बांधण्यांपासून सर्व गोष्टींसाठी मुस्लिम तरुणांचा पुढाकार असतो.
प्रतिक्रिया देताना हमीद पठाण आणि ए.जे.कोकाटे (ETV BHARAT Reporter)
अशी झाली परंपरा सुरू : साधारणता 1962 साली प्रचंड पाऊस पडला होता. याच दरम्यान पुण्यातले पानशेत धरण देखील फुटले होते. त्या काळात गणेशोत्सव पार पडत होता. गावातल्या झुंजार चौकातच साध्या पद्धतीनं गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. अचानक रात्री जोरदार पाऊस सुरू झाला. ज्यामुळं गणेश मूर्ती भिजू लागली. हे पाहून आजूबाजूच्या मुस्लिम बांधवांनी पुढे येऊन गणेश मूर्ती मशीद ठेवण्याबाबतचा प्रस्ताव हिंदू समाजापुढं ठेवला होता. गणेश मूर्ती भिजू नये, या भावनेतून मुस्लिम समाजाने हे पाऊल टाकलं होतं. मग हिंदू बांधवांनी देखील त्या ठिकाणी असणाऱ्या मशिदीमध्ये गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली होती. मग काही दिवस तिथेच गणेशाची पूजा पार पडली. ज्याला मुस्लिम बांधव देखील हजर राहायचे.
न्यू गणेश मंडळाची स्थापना : पुढे काही दिवस या ठिकाणी गणेशोत्सवामध्ये खंड पडला. पण गावातल्याच तरुणांनी 1980 साली 'न्यू गणेश मंडळाची स्थापना' केली. आता या ठिकाणी गणेश मूर्तीच्या आसऱ्यासाठी चांगली सोय करण्यात आली आहे. ज्या ठिकाणी गणेश मूर्ती बसवली जाते. ती मशिदीच्या प्रवेशद्वाराची जागा आहे. ज्या ठिकाणी गणेश मूर्ती प्रतिष्ठापना केली जाते, तिथे आता मुस्लिम-हिंदू बांधवांच्या माध्यमातून गुंबज बांधण्यात आलाय, तर त्याच्यामागे असणाऱ्या मशिदीत मुस्लिम बांधव नमाज पठण करतात.
गुण्यागोविंदाने राहतात हिंदू आणि मुस्लिम बांधव : न्यु गणेश मंडळाची स्थापना झाल्यावर सुरुवातीचे अध्यक्ष पठाण होते. त्यांनी सांगितलं की, आमच्या वाड-वडिलांपासून ही परंपरा सुरू आहे. दरवर्षी हिंदू आणि मुस्लिम बांधव मिळून हा गणेशोत्सवाचा सण साजरा करतो. यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव नसतो. इतकचं नव्हं तर शिवजयंती, दिवाळी अश्या सणांमध्ये देखील आम्ही हिंदू बांधवांच्या सोबत असतो. ईद, मोहरम अशा सणांमध्ये देखील हिंदू बांधव सहभागी होतात. गावामध्ये गेल्या कित्येक वर्षांपासून मुस्लिम बांधव आणि हिंदू बांधवांकडून हे गणेशोत्सवाची परंपरा जोपासली जात आहे. गावाच्या बाहेर अनेक ठिकाणी आम्ही हिंदू-मुस्लिम दंगल झाल्याचं ऐकतो. मात्र, या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा भेदभाव आजपर्यंत झालेला नाही. त्यामुळं आम्ही गुण्यागोविंदाने राहतो आणि सर्वच सण साजरे करतो.
मोहरम आणि गणेशाची प्रतिष्ठापना एकाचवेळी :न्यू गणेश मंडळाचे माजी अध्यक्ष अशोक पाटील यांनी सांगितलं की, मशिदीमध्ये गणेशोत्सव साजरा करण्याची परंपरा ही 1980 सालापासून सुरू झाली. हे करत असताना मुस्लिम बांधवांनी देखील त्यामध्ये पुढाकार घेतला. यातूनच मशिदीच्या आवारात ही गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते. गावातले सर्व हिंदू-मुस्लिम बांधव हे एकोप्याने राहतात.आतापर्यंत गणेशोत्सव साजरा करताना दोन वेळा मोहरम आणि गणेश उत्सव एकत्रित आले. त्यावेळी आम्ही मोहरम आणि गणेशाची प्रतिष्ठापना मशिदीत एकत्रित केली आणि मोहरम व गणेश विसर्जन मिरवणुक मोठ्या उत्साहात काढली.
हिंदू-मुस्लिम ऐक्याचं प्रतीक : ज्या पद्धतीने मुस्लिम बांधव हिंदू सणामध्ये सहभागी होतात, त्याच पद्धतीने गावातील हिंदू बांधव देखील मुस्लिमांच्या मोहरम, ईद अशा सणांमध्ये आवर्जून सहभागी होतात. त्यामुळं गावामध्ये हिंदू-मुस्लिम असा कोणत्याच प्रकारचा भेदभाव आजपर्यंत झालेला नाही. राज्याच्या आणि देशाच्या कानाकोपऱ्यात मशिद की, मंदीर यावरून वादाच्या घटना घडवून हिंदू-मुस्लिम कटूता निर्माण होण्याच्या घटना घडताना पाहायला मिळतात. अशा या परिस्थितीमध्ये न्यूगणेश मंडळाच्या माध्यमातून साजरा होणारा गणेशोत्सव हिंदू-मुस्लिम ऐक्याचं प्रतीक म्हणावे लागेल.
हेही वाचा -
- तब्बल 50 हजार 1 बटनाची गणेश मूर्ती; हिंदवी स्वराज्य गणेश मंडळाची मनमोहक सजावट पाहण्यासाठी भाविकांची गर्दी - Ganeshotsav 2024
- राजर्षी शाहूंचा कृतिशील वारसा, गेली 55 वर्ष कोल्हापुरातील 'या' मंडळाच्या अध्यक्षपदाचा मान मुस्लिम कुटुंबाकडे - Shahu mandal story