गडचिरोली :भामरागड तालुक्यापासून 12 किमी अंतरावर असलेल्या कियेर या गावातील माजी सभापतींची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना शनिवारी (1 फेब्रुवारी) रात्री 11 वाजेच्या सुमारास घडल्याचं सांगितलं जात आहे.
पोलिसांचा खबरी असल्याचा संशय : पोलिसांना मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, दक्षिण गडचिरोलीतील भामरागड तहसीलमधील कियेर गावात माओवाद्यांनी निष्पाप नागरिकाची हत्या केल्याचं आज पहाटे उघडकीस आलं. मौजा कियेर येथील रहिवासी सुखराम मडावी (वय 45 वर्षे) यांचा गळा दाबून खून करण्यात आला. मृतदेहाजवळ सापडलेल्या पत्रकात माओवाद्यांनी आरोप केलाय की, सुखराम मडावी हे पोलिसांचे खबरी होते. त्यांनी परिसरात पेनगुंडासारखे नवीन पोलीस मदत केंद्र उघडण्यास पोलिसांना मदत केली होती. तसंच ते पोलिसांना माहिती पुरवत होते.
- दरम्यान, या वर्षातील माओवाद्यांकडून करण्यात आलेली ही सामान्य नागरिकाची पहिलीच हत्या आहे. गडचिरोली पोलिसांकडून या प्रकरणात अधिक तपास सुरू आहे.
जिल्ह्यात दोन नवीन मदतकेंद्राची स्थापना-छत्तीसगड सीमेवर नक्षलग्रस्त भागात नुकतेच पेनगुंड्यात पोलीस मदत केंद्र उभारण्यात आलं. हे पोलीस मदत केंद्र सुरू झाल्यानंतर परिसराचा विकास होईल, असा विश्वास प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला. पेनगुंडापाठोपाठ भामरागड तालुका मुख्यालयापासून 18 किमी अंतरावर नेलगुंडा गावातदेखील पोलीस मदत केंद्राची स्थापना करण्यात आली. हे मदत केंद्र भामरागडपासून 20 किलोमीटर अंतरावर तर छत्तीसगड सीमेपासून 600 मीटर अंतरावर आहे. पोलीस दलाच्या 1 हजार सी-60 कमांडो, 25 बीडीएस पथक, 500 विशेष पोलीस अधिकारी, नवनियुक्त पोलीस, जवान आणि खासगी कंत्राटदार यांच्या सहकार्यातून पोलीस मदत केंद्राची स्थापना करण्यात आलेली आहे.
सर्वांगीण विकासामध्ये महत्वाची भूमिका-"गडचिरोलीत घनदाट जंगल असल्यानं नक्षलवाद्यांनी या भागात लपून हिंसक कारवाया केल्यानं जनता कंटाळेली आहे. मागील वर्षी 14 जून रोजी नेलगुंडा गावातील ग्रामस्थांनी माओवाद्यांना गावबंदी केली होती. नवीन पोलीस स्टेशनची स्थापना झाल्यानं या भागाच्या सर्वांगीण विकासामध्ये महत्वाची भूमिका बजाविता येईल," असा विश्वास गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी व्यक्त केला होता.
हेही वाचा -
- छत्तीसगड, ओडिशाच्या सीमावर्ती भागात नक्षलवाद्यांशी चकमक; 16 नक्षलवाद्यांना ठार करण्यात यश
- पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयावरुन नक्षलवाद्यांनी केली गावकऱ्याची हत्या
- छत्तीसगडमधून मार्च 2026 पर्यंत नक्षलवाद हद्दपार करा; गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्या सूचना, रायपूरमध्ये घेतली आढावा बैठक