अमरावती : मेळघाटात पाच दिवसांपूर्वी अंजनगाव वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या पांढरा खडक वर्तुळात मृतावस्थेत आढळलेल्या वाघाच्या मृत्यू प्रकरणात चौघांना अटक करण्यात आली. वनविभागानं त्यांच्याकडून वाघाची चार नखं जप्त केली आहेत.
असं आहे प्रकरण : मेळघाट प्रादेशिक विभाग परतवाडा अंतर्गत अंजनगाव वनपरिक्षेत्रात पांढरा खडक वर्तुळातंर्गत 26 नोव्हेंबरला सायंकाळी जंगलात गस्तीवर असणाऱ्या कर्मचाऱ्यांना एक नर वाघ मृतावस्थेत आढळला होता. 27 नोव्हेंबरला सकाळी विशेष पथकाने मृत वाघाच्या स्थळाचा पंचनामा केला असता, या वाघाचे तीन पंजे कापून नेले असल्याचे आढळून आले. दरम्यान, वाघाचे काही अवशेष हे उत्तरीय तपासणीकरिता फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आलेत. मृत अवस्थेत आढळलेल्या वाघाचे पंजे कापून नेण्यात आल्यामुळे या प्रकरणाचं गांभीर्य वाढलं होतं.
आरोपी अकोला जिल्ह्यातले : मेळघाटातील मृत वाघाचे पंजे कापून नेणारे चार आरोपी अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यात येणाऱ्या बल्लाखेडा या गावातून वनविभागाने रविवारी ताब्यात घेतलेत. या आरोपींची कसून चौकशी केली असता, त्यांच्या जवळून वाघाची चार नखं जप्त करण्यात आलीत. वाघाचे पंजे नेमके कुठे नेलेत आणि उर्वरित नखं कुठे आहेत? याचा शोध घेण्यासाठी या चारही आरोपींची उलट तपासणी घेतली जात आहे.
दगावला की घातपात? :अटक करण्यात आलेल्या या चार व्यतिरिक्त आणखी काही आरोपींचा सहभाग या प्रकरणात आहे का? याची चौकशी देखील केली जात असल्याची माहिती मेळघाट प्रादेशिक वनविभागाचे उपवनसंरक्षक अग्रीम सैनी यांनी दिली. मृत वाघाच्या शवविच्छेदनाचा अहवाल अद्याप समोर आलेला नाही. हा वाघ नेमका कसा दगावला की या वाघाच्या मृत्यू मागे काही घातपात आहे का? हे अहवाल आल्यावरच स्पष्ट होईल, असं वनविभागाच्या वतीनं सांगण्यात आलं.
हेही वाचा -
- चंद्रपुरात मानव अन् वन्यजीव संघर्ष शिगेला; तीन वर्षांत 98 वाघ-बिबट्यांचा मृत्यू, तर वन्यजीवांच्या हल्ल्यात 145 जणांनी गमावला जीव
- मेळघाटातील मृत वाघाचे तीन पंजे नेले कापून; मृत्यूचं कारण अस्पष्ट
- भंडारा जिल्ह्यात रेल्वेच्या धडकेत वाघिणीला गंभीर दुखापत