कोल्हापूर Sambhaji Raje Warns Hasan Mushrif:घोटाळे करून महायुतीची वाट धरणाऱ्या पालकमंत्री हसन मुश्रीफांनी मला पुरोगामीत्व शिकवू नये, असा हल्लाबोल स्वराज्य पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केलाय. रविवारी विशाळगडावर अतिक्रमण मुक्त मोहीम राबवण्यात आली. यावेळी झालेल्या हिंसाचारावर बोलताना पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी विशाळगड अतिक्रमण प्रकरण न्यायप्रविष्ट असताना संभाजीराजेंनी अशी भूमिका का घेतली? असा सवाल उपस्थित केला होता. त्याला संभाजीराजेंनी प्रत्युत्तर दिलं.
विशाळगडावर बंदोबस्त न केल्याचा आरोप :विशाळगड अतिक्रमण हा विषय गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. मी तर गेले दीड वर्षांपासून या प्रकरणाचा पाठपुरावा करत आहे. प्रशासनाला माहीत होतं शिवभक्त येणार आहेत. मग त्यांनी आधिच निर्णय का दिला नाही? मी विशाळगडावर जाणार आहे हे माहीत होतं तर पालकमंत्र्यांनी पुढाकार घ्यायला हवा होता. शिवभक्तांचा आक्रोश होता हे प्रशासनाला माहीत होतं. मी तिथे येणार आहे हे देखील प्रशासनाला माहीत होतं; मग प्रशासनाने बंदोबस्त का लावला नाही? तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी अतिक्रमण काढण्याचा धाडसी आदेश दिला. अतिक्रमण काढण्यासाठी सुरुवात झाली; मात्र ते पुन्हा थांबवण्यात आले. ते कोणी थांबवलं? एक पुढारी नेता या गडकोट किल्ल्यांबद्दल काही बोलत नाही. छत्रपती शिवरायांच्या साडेतीनशेव्या शिवराज्याभिषेक सोहळ्यावेळी 350 कोटी रुपये गड संवर्धनासाठी जाहीर केले होते. याच पुढं काय झालं? विशाळगडावरील अतिक्रमण काढावं हा एकच माझा प्रामाणिक हेतू आहे, अशी षडयंत्र करून मला परिणाम करण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक होत असेल तर मी गडसंवर्धन मोहिमेचे काम थांबवतो, असं उद्विग्नपणे संभाजीराजे छत्रपती म्हणाले.