नाशिक :दिंडोरी लोकसभ मतदार संघाचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचं आज सकाळी दुःखद निधन झालं. त्यांच्या निधनाची माहिती दिंडोरी लोकसभा मतदार संघात वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्या निधनाबाबत शोक व्यक्त करण्यात आला. त्यानंतर ठिकठिकाणी माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्या कार्याबद्दल चर्चा ऐकावयास मिळाल्या. हरिश्चंद्र चव्हाण यांची गेल्या काही दिवसांपासून प्रकृती बरी नव्हती. त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी पाटील गल्ली क्रमांक 4 कॉलेज रोड, नाशिक या त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलेलं आहे.
भारती पवारांचा केला होता दणक्यात पराभव :हरिश्चंद्र चव्हाण यांनी 2009 आणि 2014 च्या लोकसभा निवडणुकीवेळी दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवला. लोकसभा निवडणूक 2014 मध्ये त्यांनी माजी खासदार भारती पवार यांचा मोठ्या फरकानं पराभव केला. भारती पवार त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढल्या. दरम्यान 2019 मध्ये भारती पवार भाजपामध्ये आल्या. त्यानंतर भाजपानं हरिश्चंद्र चव्हाण यांची उमेदवारी नाकारून भारती पवार यांना उमेदवारी दिली. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भारती पवार यांनी मोठ्या फरकानं विजय मिळवला. भाजपानं भारती पवार यांना उमेदवारी दिली, त्यानंतरही हरिश्चंद्र चव्हाण हे भाजपाशी एकनिष्ठ राहिले.