महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

"आता खपवून घेतलं जाणार नाही"; परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी ठणकावलं

देशातील घुसखोरीवर यशस्वीपणे नियंत्रण मिळवण्यात आलंय. मोदी सरकार सर्व आवश्यक उपाययोजना करत असून देशाच्या सीमा सुरक्षित आहेत, असं परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी सांगितलं.

Foreign Minister S Jaishankar
परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर (Source - ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : 5 hours ago

Updated : 4 hours ago

मुंबई : मुंबईत दहशतवादी हल्ला घडला तेव्हा प्रत्युत्तर देण्यात आलं नाही, मात्र मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यासारखी घटना आता पुन्हा घडू देणार नाही. पूर्वीसारखे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, योग्य प्रत्युत्तर दिलं जाईल, असं देशाचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी ठणकावलं. ते मुंबईत पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते.

केंद्राला सहकार्य मिळणं गरजेचं :देशातील घुसखोरीवर बऱ्यापैकी नियंत्रण मिळवण्यात यश आलंय. मोदी सरकार देशाच्या सीमेच्या सुरक्षेसाठी आवश्यक असलेल्या सर्व उपाययोजना करत असून, देशाच्या सीमा सुरक्षित असल्याचे ते म्हणाले. केंद्र सरकार देशाची प्रतिमा आंतरराष्ट्रीय स्तरावर तयार करते. मात्र, अनेकदा अंमलबजावणीसाठी राज्य स्तरावर कार्यवाही होण्याची गरज असते. त्यामुळं दोन्ही ठिकाणी समान विचारांच्या सरकारची गरज असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. केंद्र सरकार विदेशातून गुंतवणूक आणते, मात्र राज्य सरकारची भागीदारी व सहकार्य केंद्राला मिळणं गरजेचं आहे, असं मत जयशंकर यांनी व्यक्त केलं. जयशंकर यांच्या पत्रकार परिषदेमध्ये मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलारही उपस्थित होते.

केंद्र सरकारवर आरोप करुन चालणार नाही : जयशंकर म्हणाले, "जीडीपीमध्ये देश पाचव्या क्रमांकावर आहे. 10 वर्षांपूर्वी आपला देश 10 व्या क्रमांकावर होता, ही परिस्थिती अशीच बदलली नाही. मोदी सरकारनं पायाभूत सुविधा पुरवल्यानं हा बदल घडलाय. गुंतवणूकदार राज्यातील परिस्थिती पाहून गुंतवणूक करतात. प्रकल्प आले नाहीत, तर त्यासाठी राज्यातील सरकारची भूमिका देखील कारणीभूत असते. केवळ केंद्र सरकारवर आरोप करुन चालणार नाही." "राज्य सरकारच्या कामगिरीवर गुंतवणूकदार येतात, राज्य व केंद्र एका विचाराचे असल्यास गुंतवणूकदारांसाठी अनुकूल वातावरण तयार होते. सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्रात विकासाची घोडदौड व्हावी," अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. मोदी सरकारच्या काळात भारताचे परराष्ट्र धोरण सशक्त झाल्याचा दावा त्यांनी केला.

दोन्ही देशांत एकमत :भारत चीन संबंधांबद्दल बोलताना एस. जयशंकर म्हणाले, "लडाखमधील पेट्रोलिंग परिस्थितीवर दोन्ही देशांत एकमत झालंय. भारत दहशतवादाविरोधात खंबीरपणे उभा आहे. जगसुद्धा याकडे पाहत आहे." "मणिपूरमधील घटनांना विविध कारणं आहेत. मात्र, मणिपूरच्या नावावर देशाची प्रतिमा बनवणं राजकीय कृती असून ही राष्ट्रद्रोही प्रवृत्ती आहे," अशी टीकाही जयशंकर यांनी यावेळी विरोधकांवर केली.

बारा औद्योगिक विभाग बनवणार : देशात बारा औद्योगिक विभाग बनवणार असून, त्यासाठी नवीन बंदरांची निर्मिती, विकास, पायाभूत सुविधा वाढवण्यावर भर दिला जात असल्याची माहिती त्यांनी दिली. तरुणांमधील गुणवत्तेला रोजगाराच्या संधी वाढवत असून युरोप, अमेरिकासह विविध देशांसोबत याबाबत विविध करार झाल्याची माहिती त्यांनी दिली. रोजगार, विकासावर तिसऱ्या कार्यकाळात सरकारचा भर आहे. सीमा सुरक्षेला प्राधान्य असल्याचं जयशंकर यावेळी म्हणाले.

हेही वाचा

  1. नाकाबंदी दरम्यान पोलिसांनी जप्त केली 1 कोटी 32 लाख रुपयांची रोकड, 5 जण ताब्यात
  2. रेल्वे पकडताना वांद्रे रेल्वे स्टेशनवर चेंगराचेंगरी, दोन प्रवासी गंभीर जखमी
  3. गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय नाशिक पूर्व मतदारसंघातून फुंकणार तुतारी, शरद पवारांचा भाजपाला धक्का
Last Updated : 4 hours ago

ABOUT THE AUTHOR

...view details