नवी मुंबई: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या धावपट्टीवर वायुदलाच्या लढाऊ विमानाची उड्डाण चाचणी यशस्वीरीत्या पार पडलीय. आज 11 ऑक्टोबरला शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार नरेश मस्के, सुनील तटकरे, गणेश नाईक यांच्या उपस्थितीमध्ये ही चाचणी घेण्यात आली होती. त्यावेळी वायू दलाचे लढाऊ विमान सुखोई नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरवण्यात आलंय. मार्च 2025 मध्ये या विमानतळावरून पहिल्या विमानाचे उड्डाण होणार असल्याचे केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर यांनी सांगितले होते.
मुंबई विमानतळाचा भार कमी होणार : मुंबई विमानतळावरून प्रतिवर्षी 45.2 दशलक्ष प्रवासी ये-जा करतात, तर रोज 930 विमाने आकाशात झेपावतात, त्याचा भार कमी करण्यासाठी नवी मुंबई विमानतळ हा टप्पा महत्त्वाचा मानला जातोय, भूसंपादन प्रक्रिया आणि अत्यावश्यक परवानग्या मिळविण्यास विलंब झाल्याने हा प्रकल्प रखडलाय. 2014 मध्ये केंद्रात आणि राज्यात भाजपाचे सरकार सत्तारूढ झाल्यानंतर रखडलेल्या या प्रकल्पाला गती देण्यात आलीय. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला वने व पर्यावरण विभागाची पहिल्या टप्प्याची परवानगी 17 नोव्हेंबर 2010 मध्ये मिळाली; परंतु दुसऱ्या टप्प्याच्या परवानगीसाठी चक्क 2017 उजाडले. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांनी दिल्लीत तळ ठोकून सहा महिन्यांपूर्वी ही परवानगी मिळवून घेतली. त्यानंतर 2000 कोटी रुपये खर्चाच्या विमानतळाच्या आधीच्या कामांच्या वर्कऑर्डर काढण्यात आल्यात.