गडचिरोली Father Carry Dead Bodies Of Kids :जन्मापासून ज्या मुलांना अंगाखांद्यावर घेऊन वाढवलं, त्या काळजाच्या तुकड्यांचा अखेरचा प्रवासही खांद्यावर घेऊन करावा लागण्याची दुर्दैवी वेळ आदिवासी दाम्पत्यावर आली. अंधश्रद्धा आणि वर्षानुवर्षे सुविधांचा अभाव यामुळे या चिमुकल्यांना नेमकं काय झालं याचं योग्य निदान होण्याआधीच त्यांना जीव गमवावा लागला. अंधश्रद्धेच्या पगड्यामुळे आई-वडिलांनी शवविच्छेदनाला नकार देत मृतदेह खांद्यावर घेऊन तब्बल 15 किमीची पायपीट केली. ही धक्कादायक तितकीच काळीज पिळवटून टाकणारी घटना गडचिरोली जिल्ह्यातील पत्तीगाव इथं आज सकाळी उघडकीस आली. बाजीराव रमेश वेलादी (६ वर्षे) आणि दिनेश रमेश वेलादी (साडेतीन वर्षे, रा. येर्रागड्डा) अशी त्या भावंडांची नावं आहेत. विशेष म्हणजे मामाच्या गावी आल्यानंतर त्यांना ताप आला अन् त्यातच त्यांचा करुण अंत झाल्यानं हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
मृतदेह खांद्यावरुन नेताना आई वडील (Reporter) आरोग्य विभागाच्या सूचनेचं पालन न करता ते मुलांचे मृतदेह घेऊन गेले. मात्र त्या बालकांवर अग्निसंस्कार झाले नसल्यामुळे मृतदेह पुन्हा रुग्णालयात आणून शवविच्छेदन करण्याचे प्रयत्न आरोग्य यंत्रणेकडून सुरू आहेत. - आयुषी सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद
पोळ्याच्या सणाला गेले होते मामाच्या गावी :पोळ्याच्या सणानिमित्त रमेश वेलादी हे त्यांची पत्नी आणि दोन्ही चिमुकल्यांना घेऊन मामाच्या गावाला पत्तीगाव इथं आले होते. त्या ठिकाणी ताप येण्याचं निमित्त झालं आणि उपचारासाठी डॉक्टरऐवजी त्या चिमुकल्यांना पुजाऱ्याकडं नेण्याची चूक आई-वडिलांनी केली. पुजाऱ्यानं दिलेल्या जडीबुटीनं त्या बालकांच्या प्रकृतीत सुधारणा होण्याऐवजी प्रकृती आणखीच बिघडली. त्यामुळे मुलांना वेळेवर योग्य उपचार मिळाले नाहीत.
मृतदेह खांद्यावर घेऊन नाल्याच्या चिखलातून पोहोचले घरी :चिमुकल्यांची प्रकृती खालावल्यानं अखेर पायपीट करत रमेश वेलादी यांनी त्यांना जिमलगट्टा प्राथमिक आरोग्य केंद्र गाठलं. मात्र त्यांना मोठा उशीर झाला. त्यांचा मोठा चिमुकला बाजीरावचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी स्पष्ट केलं, तर दीड तासानं छोटा मुलगा दिनेशनंही प्राण सोडला. त्यामुळे वेलादी परिवारांवर मोठा दु:खाचा [डोंगर कोसळला. चिमुकल्यांचा मृत्यू झाल्यानं त्यांनी मृतदेह गावी नेण्याचं ठरवलं. मात्र जिमलगट्टा इथून पत्तीगावला जाण्यासाठी पक्का रस्ता नसल्यानं चारचाकी वाहन जाण्यासाठीही अडचण आहे. त्यात रुग्णवाहिका उपलब्ध होण्यास उशीर झाला. मात्र मृतदेह शवविच्छेदनास नेण्यास वेलादी परिवारानं नकार देत मुलांचे मृतदेह स्वत:च गावाकडं घेऊन जात असल्याचं सांगितलं. मृतदेह खांद्यावर घेऊन ते नाल्याच्या पाण्यातून आणि चिखलातून वाट काढत गावाकडं आले.
मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यास नकार :दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाल्यानं मोठी खळबळ उडाली. त्यांचे मृतदेह नेण्यासाठी देचलीपेठा इथून रुग्णवाहिका बोलावण्यात आली. मात्र वेलादी दाम्पत्यानं मृतदेह शवविच्छेदनासाठी नेण्यास नकार दिला. रुग्णवाहिका या परिसरातून जात नसल्याचं प्रशासनाच्या वतीनं सांगण्यात आलं. बरंच अंतर पायी गेल्यानंतर वेलादी यांचे नातेवाईक दुचाकीनं मृतदेह घेण्यासाठी आले. त्यावरुन ते पत्तीगावला पोहोचले. मृतदेहाचे शवविच्छेदन न झाल्यानं मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होऊ शकलेलं नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
शवविच्छेदनासाठी मन वळवण्याचा प्रयत्न :दोन चिमुकल्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याचं निदान करणं आरोग्य विभागाच्या दृष्टिनं महत्वाचं आहे. पण आई-वडिलांच्या आग्रहापुढं संबंधित आरोग्य यंत्रणा हतबल झाली. आरोग्य विभागाच्या सूचनेचं पालन न करता ते मुलांचे मृतदेह घेऊन गेले. मात्र त्या बालकांवर अग्निसंस्कार झाले नसल्यामुळे मृतदेह पुन्हा रुग्णालयात आणून शवविच्छेदन करण्याचे प्रयत्न आरोग्य यंत्रणेकडून सुरू आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांनी दिली.
हेही वाचा :
- भयंकर! मांजरानं चावा घेतल्यानं चिमुकल्याचा मृत्यू; नागपुरातील दुर्मिळ घटना
- Child Died in Satara : धक्कादायक! साताऱ्यातील शिरवळमध्ये पाण्याच्या टाकीत बुडून पाच वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू
- Ganesh Idol Immersion : एकीकडं बाप्पाच्या निरोपाचा जल्लोष दुसरीकडं विसर्जन हौदात 5 वर्षीय चिमुकल्याचा बुडून मृत्यू