गडचिरोली Gadchiroli Flood News : 'श्रमलेल्या बापासाठी लेक नारळाचं पाणी अन् लढणाऱ्या लेकीसाठी 'बाप बुलंद कहाणी' कवितेच्या या ओळीप्रमाणं गडचिरोलीतील एका चिमुरडी मुलीसाठी तिचा बाप जीवावर उदार झाला. झालं असं, प्रशासनाच्या निष्काळजीमुळं गडचिरोली जिल्ह्यातील अनेक नागरिकांना पावसाळ्यात कसरत करत नदी-नाले ओलांडावी लागतात. अशातच तापानं फणफणत असलेल्या तीन वर्षाच्या चिमुकलीला घेवून वडिलांनी दोन नद्या ओलांडत जीव वाचवला.
व्हिडिओ व्हायरल :प्रशासनाच्या ढोबळ कारभारामुळे दोन वर्ष लोटून देखील पुलाचे बांधकाम पूर्ण न झाल्यामुळे तापाने फणफणत असलेल्या ३ वर्षीय मुलीला तिच्या वडिलांनी तुडुंब भरून वाहणाऱ्या दोन नाले ओलांडून प्राथमिक आरोग्य केंद्रात भरती केलं. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला असून प्रशासनाच्या नाकर्तेपणाची सर्वत्र चर्चा होत आहे.
नेमकं काय घडलं? : गडचिरोली जिल्ह्यातील बहुतेक भाग घनदाट जंगल, डोंगर, दऱ्याखोऱ्यानीं वेढलेला आहे. या भागात पावसाळ्यात आरोग्यसेवा कोलमडून जाते. भामरागड तालुक्याच्या लाहेरी ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या बंगाडी गावात १३ जुलै रोजी अशीच एक घटना घडली. रवीना पांडू जेट्टी हिला ताप आला. दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी तिचा ताप आणखी वाढला. तेव्हा सकाळच्या सुमारास तिच्या वडिलांनी मुलीला लाहेरी प्राथमिक आरोग्य केंद्रात आणलं. तिच्या रक्ताचे नमुने घेतल्यावर तिला हिवताप असल्याचं कळलं. त्यामुळं पुढील उपचारासाठी तिला आरोग्य केंद्रात भरती करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. परंतु, वडील पांडू जेट्टी त्यासाठी तयार नव्हते. अखेर ते आपल्या गावी बंगाडी येथे परतले.
मुलीला कडेवर घेऊन प्रवास :मुलीचा ताप आणखी वाढत असल्याची बाब अधिकाऱ्यांनी लाहेरी येथील नागरिकांना सांगितली असता त्यांनी ६ किमी अंतरावरील बंगाडी गाव गाठून पांडू जेट्टी यांची समजूत काढली. दरम्यान, मुलीला लाहेरी येथे आणताना दोन नाले पुराने तुडुंब भरले होते. मुलीला कडेवर घेऊन दोन्ही नाले ओलांडून सायंकाळी ७:३० वाजता लाहेरी गाठले. सध्या तेथे तिच्यावर उपचार सुरू असून प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
नदीतून जीवघेणा प्रवास : लाहेरीपासून सहा किलोमीटर अंतरावर गुंडेनूर नदी बंगाडी गावाजवळून वाहते. दरवर्षी पावसाळ्यात ही नदी तुडुंब भरून वाहते. मागील दोन वर्षापासून नदीवरील पुलाचं बांधकाम केलं जात आहे. मात्र, हे काम अद्यापही पूर्ण होऊ शकलेले नाही. तसंच बंगाडी येथे बेलीब्रिजचे काम सुरू आहे. परंतु, तेदेखील अपूर्ण असल्याने गुंडेनूर पलीकडील बहुतांश गावातील नागरिकांना लाहेरी किंवा भामरागड तालुका मुख्यालय गाठण्यासाठी जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. अशाच परिस्थितीत मलेरिया ग्रस्त रविनाला घेऊन तिच्या वडिलांना जीवघेणा प्रवास करावा लागला असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली. हेही वाचा
- लोकसहभागातून प्रगतीची नांदी, नक्षलींच्या बालेकिल्यातच माओवाद्यांना गावबंदी - Gadchiroli Naxalites News
- हातावरील मेंदीचा रंग ओला असतानाच नवरदेवाचा पाण्यात बुडून मृत्यू; वाचवण्याच्या प्रयत्नात भावजीसह मेव्हण्यानंही गमवला जीव - Gadchiroli News