महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मेळघाटात दुर्मिळ 'चौधारी'; बियांपासून बनवता येते दूध, आरोग्य होते सुदृढ: 'या' देशात घेतात उत्पादन - RARE CHAUDHARI PLANT IN MELGHAT

मेळघाटात चौधारी दुर्मिळ वनस्पती वेल आढळून येते. यावेलीच्या शेंगा मानवी आरोग्यास उपयुक्त आहेत, असा दावा तज्ज्ञांचा आहे. याबाबत ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी शशांक लावरेंचा खास रिपोर्ट.

Rare Chaudhari Plant In Melghat
दुर्मिळ चौधारी (Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : 10 hours ago

Updated : 10 hours ago

अमरावती : भरपूर प्रमाणात असणारं प्रोटीन, व्हीटामिन, फॉलिक अ‍ॅसिड मानवाच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरतात. यासोबतच कोलेस्ट्रॉल नियंत्रणात आणण्यासाठी आवश्यक असं घटक समावलेलं असणारी दुर्मिळ चौधारी शेंग मेळघाटच्या पायथ्याशी असणाऱ्या धामणगाव गढी परिसरात वेलीवर बहरली. दुर्मिळ असणारी ही शेंग खाल्ल्यानं माणसाचं आरोग्य सुदृढ होतं त्याचप्रमाणं ज्या भागात या शेंगांची वेल बहरते ती जमीन आणखी सुपीक होते. चारही बाजूंनी खरखरीत धारा या शेंगांवर असल्यानं तिला चौधारी म्हटल्या जाते. वैशिष्ट्यपूर्ण असणाऱ्या या चौधारी शेंग संदर्भात 'ईटीव्ही भारत'चा स्पेशल रिपोर्ट.

दुर्मिळ चौधारी (Reporter)

धामणगाव गडी परिसरात बहरली वेल :परतवाडा - चिखलदरा मार्गावर धामणगाव गडी या गावात रमेश जोशी यांच्या शेतात चौधारी शेंगचा वेल बहरला. "चौधारी शेंगाचं बी शेतात पेरलं आणि हिरवीगार वेल माझ्या शेतात बहरली. वेलीला आलेल्या या शेंगांवर चारही बाजूनं धारा आहेत. त्यामुळं हिला चौधारी शेंग म्हटल्या जाते," असं रमेश जोशी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना म्हणाले.

मेळघाटात दुर्मिळ 'चौधारी'; बियांपासून बनवता येते दूध, आरोग्य होते सुदृढ: 'या' देशात घेतात उत्पादन (Reporter)

शेंगांची होते भाजी :"बरबटी किंवा गवाराच्या शेंगांसारखीच चौधारी शेंगांची भाजी बनते. ही शेंग चवदार असल्यामुळे भाजी देखील छान लागते. सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेले शेतकरी बांधव आपल्या पानांच्या मळ्यात चौधारी शेंगांची वेल मोठ्या प्रमाणात लावतात. अतिशय कमी खर्चात मोठ्या प्रमाणात या शेंगा येतात. पौष्टिक असणाऱ्या या शेंगांना 100 रुपये किलो असा भाव मिळतो," असं देखील रमेश जोशी म्हणाले.

दुर्मिळ चौधारी शेंग (Reporter)

या देशात आढळते चौधारी शेंग :"चौधारी शेंगाचं वैज्ञानिक नाव 'सोफो कार्पस कॅट्रा गोनोलोंबस' असं असून उष्णकटिबंधीय प्रदेशात येणारी ही वेलवर्गीय वनस्पती आहे. थायलंड, मलेशिया, इंडोनेशिया, बांगलादेश या देशांमध्ये या शेंगाचा प्रयोग प्रामुख्यानं केला जातो. न्यू पापुवा गेनी या जगातील सर्वात मोठ्या बेटावर ही शेंग सर्वात जास्त वापरली जाते," अशी माहिती वनस्पती शास्त्राच्या अभ्यासक प्रा डॉ अर्चना मोहोड यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली. "या वनस्पतीचा उगम मॉरिशियस किंवा भारतात झाल्याचं आढळून येते. या दोन देशातूनच इतर देशात ही वनस्पती बहरली," असं देखील प्रा डॉ अर्चना मोहोड यांनी सांगितलं.

या शेंगांचं असं आहे वैशिष्ट्य :"चौधारी शेंगामध्ये सोयाबीन इतकच प्रोटीनचं प्रमाण आहे. सोयाबीनच्या तुलनेत मात्र या वनस्पतीचा प्रत्येक भाग हा खाण्यायोग्य आहे. या वनस्पतीची पानं, फुलं, शेंगा सर्वच खाण्यायोग्य आणि आरोग्यदायी आहे. याच्या पानांपासून सूप बनवलं जाते. सलाद म्हणून देखील ही पानं खातात. शेंगा तर खाण्या योग्य आहेतच, मात्र या शेंगा सुकवल्यावर त्यामधील बियांपासून दूध देखील तयार करता येते. याच्या दुधापासून खास चीज तयार होते. या वनस्पतीचा कंद देखील भाजून खाल्ल्या जातो. प्रोटीन सोबतच या शेंगांमध्ये फायबरचं प्रमाण अधिक आहे. पचनाशी संबंधित सर्व विकारांवर ही शेंग उपयुक्त आहे. लोह, तांबं, पोटॅशियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम हे सर्व मिनरल्स यामध्ये आढळतात. त्यामुळं याची पौष्टिकता अधिक वाढते. विटामिन ए, विटामिन डी, विटामिन सीचं प्रमाण देखील यामध्ये विपुल प्रमाणात आढळते," अशी माहिती तज्ज्ञांनी दिली.

उत्तम आरोग्यासाठी फायदेशीर :"यामध्ये असणाऱ्या फॉलिक अ‍ॅसिडमुळं महिलांमधील पुनरुत्पादन क्षमते संदर्भातील विकारांवर मात करता येते. यामध्ये फैटोस्टोरेल नावाचा घटक आहे. ज्यामुळं आपल्या शरीराची बॅक्टेरिया विरोधातील प्रतिकारशक्ती वाढते. कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्याची क्षमता देखील चौधारी शेंगा सेवन केल्यानं वाढते. उन्हातून मिळणारं विटामिन डी हे चौधारी शेंग खाल्ल्यामुळं आपल्या शरीराला मिळते. महिलांच्या रजोनिवृत्ती संदर्भात असणाऱ्या समस्यांवर देखील या शेंगा खाल्ल्यानं मात करता येते," असं देखील प्रा डॉ अर्चना मोहोड यांनी सांगितलं.

जमिनीची वाढते सुपीकता :"मानवाच्या आरोग्यासाठी चौधारी शेंग ही अतिशय उपयुक्त ठरणारी आहेच. यासोबतच ही वनस्पती शेतकऱ्यांसाठी देखील अतिशय उपयुक्त ठरणारी आहे. जमिनीमध्ये नत्र स्थिर करण्यासाठी ही वनस्पती फायदेशीर ठरते. जमिनीत नत्र स्थिर झाल्यामुळं जमिनीची सुपीकता वाढते. यामुळे चौधारी शेंगांची वेल शेतकऱ्यांनी आपल्या शेतात लावणं फायद्याचं आहे," असं प्रा डॉ अर्चना मोहोड यांनी स्पष्ट केलं.

हेही वाचा :

  1. गवतासाठी चढावा लागतो मेळघाटातील गाविलगडचा किल्ला; तीन गावातील गवळी बांधवांची रोज मरणयातनांची 'चढाई'
  2. कधीही न आटणाऱ्या विहिरीतून सतत वाहतो पाण्याचा झरा, गावात विहिरीची 'बाळ समुद्र' अशी ओळख
  3. मेळघाटातली 'गढी'; पांढऱ्या मातीत दडलाय 'हा' इतिहास
Last Updated : 10 hours ago

ABOUT THE AUTHOR

...view details