सांगोला(सोलापूर) EVM set on fire by petrol :माढा लोकसभा मतदारसंघातील सांगोला विधानसभा क्षेत्रातील बागलवाडी येथे एका मतदारानं पेट्रोल टाकून EVM मशीन जाळण्याचा प्रयत्न केला. यामुळं काही काळ या ठिकाणी मतदान प्रक्रिया बंद थांबण्यात आली होती. माढा लोकसभा मतदारसंघासाठी सकाळी सात वाजल्यापासून शांततेत मतदान प्रक्रिया सुरू होती. मात्र, मतदान यंत्र जाळल्याचा प्रकार घडल्यानं मतदानला गालबोट लागल्याची चर्चा सांगोला तालुक्यामध्ये सुरू आहे. माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये भाजपाचे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, शरद पवार राष्ट्रवादी गटाचे धैर्यशील मोहिते पाटील यांच्यामध्ये चुरशीची लढत आहे. तसंच या ठिकाणी वंचितचे रमेश बारस्कर हे देखील उमेदवार आहेत. यावेळी माढा लोकसभेसाठी एकूण 32 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यांमध्ये आज 11 लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान झालं. प्रशासनाने यासाठी जय्यत तयारी केलेली होती. मात्र, बागलवाडी या ठिकाणी एका मतदारानं दुपारच्या सुमारास मतदान यंत्रालाच आग लावल्यानं खळबळ उडाली होती. त्यामुळं काही काळ मतदान प्रक्रिया बंद करण्यात आली होती. मतदानयंत्रावर त्यानं पेट्रोल टाकून एक मराठा लाख मराठाच्या घोषणा दिल्या. त्यानंतर पोलिसांनी मतदाराला ताब्यात घेतलं.