मुंबई Economic Offence wing : युसुफ लकडावाला तुरुंगात असताना त्याचा सावत्र मुलगा फिरोज लकडावाला यानं शेअर्ससंबंधी अफरातफर केल्याचा आरोप करत युसुफच्या पत्नीनं आर्थिक गुन्हे शाखेत गुन्हा दाखल केला होता. त्या तक्रारीवरून बुधवारी आर्थिक गुन्हे शाखेनं गुन्हे शाखेनं फिरोज, त्याची पत्नी नूरी आणि इतरांच्या विरोधात भारतीय दंड संविधान कलम ४०६, ४२० , ३४ आणि १२० ब अन्वये गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती आर्थिक गुन्हे शाखेचे सहपोलिस निशिथ मिश्र यांनी दिली आहे. अंमलबजावणी संचालनालयानं (ईडी) मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात बिल्डर आणि फायनान्सर युसुफला अटक केली होती. दरम्यान, सप्टेंबर २०२१ मध्ये आर्थररोड कारागृहात लाकडावाला याचा मृत्यू झाला होता.
चौकशीत उघड झाले आरोप: आर्थिक गुन्हे शाखेच्या चौकशीत आरोपी फिरोज लकडावाला, त्याची पत्नी नूरी लकडावाला आणि इतरांनी 10 प्रायव्हेट लिमिटेड कंपन्यांमधील शेअर्सचे हक्क जारी करून गुन्हेगारी कट रचला असल्याचे स्पष्ट झाले आहे. या १० कंपन्यांमध्ये तक्रारदार सबिनाचे मृत पती बहुसंख्य शेअरहोल्डर होते. त्यांना या शेअर्सचे सदस्यत्व घेण्याचा अधिकार वापरण्याचा पर्याय न देता, बोर्ड मीटिंग न घेता, भागीदारीसाठी कोणतीही नोटीस जारी न करता किंवा कोणतेही नवीन खाते न उघडता आणि महत्त्वाचं म्हणजे असे हक्क जारी करण्यात आले की, ज्यात फेस व्हॅल्यू ही नेट असेट्स व्हॅल्यू पेक्षा 100 पटीने कमी होती. अशा प्रकारे आरोपीने मृत वडीलांचे शेअरहोल्डिंग आणि तक्रारदार सबिना यांचे शेअर होल्डिंग कमी केलं आणि तिचे ४५ कोटींपेक्षा अधिक रुपयांचे नुकसान केले, म्हणून तक्रारदार सबिना लकडावाला यांनी आर्थिक गुन्हे शाखेला तक्रार दिली होती. प्राथमिक चौकशीनंतर बुधवारी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.