पुणे Engineer Girl Died In Valley :पर्यटन नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोणावळा शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. लोणावळा फिरण्यासाठी आलेली एक 21 वर्षीय इंजिनियर तरुणी खोल दरीत पडल्यानं तिचा मृत्यू झाला आहे. अथक प्रयत्नानंतर शिवदुर्ग मित्र या पथकानं खोली दरीतून तब्बल 24 तासानंतर तरुणीचा मृतदेह बाहेर काढला आहे. साक्षी रमेश होरे असं या दरीत पडून मृत्यू झालेल्या तरुणीचं नाव आहे. साक्षी ही एकटीच लोणावळा फिरण्यासाठी आली होती, अशी माहिती तिच्या नातेवाईकांनी दिली आहे.
लायन्स पॉईंटवरुन दरीत पडली साक्षी :साक्षी होरे वय 21, रा. म्हासाडे कान्हूंरकर वस्ती, दावडी, पुणे) ही तरुणी लोणावळा फिरण्यासाठी बुधवारी आली होती. लोणावळा शहराच्या जवळ असलेल्या लायन्स पॉईंट या ठिकाणी बुधवारी रात्री साक्षी फिरत होती. यावेळी साक्षी खोल दरीत पडल्याीच घटना घडली. गुरुवारी सकाळी पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास दरीत पडलेल्या साक्षीचा मृतदेह बाहेर काढण्यात लोणावळ्यातील शिवदुर्ग मित्र या रेस्क्यू पथकाला यश आलं आहे. साक्षी इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्गात शिकत होती. साक्षी हिचे चुलते विकास किसन होरे (रा. गव्हाणे वस्ती, भोसरी) यांनी याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
दोनशे मीटर खोल दरीत पडली साक्षी :मिळालेल्या माहितीनुसार, साक्षी ही आकुर्डी येथील डी. वाय. पाटील महाविद्यालयात शिकत होती. बुधवारी ती एकटीच लोणावळ्यातील लायन्स पॉईंट इथं फिरायला आल्याची माहिती तिच्या कुटुंबीयांनी दिली आहे. सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ती लायन्स पॉईंटच्या एका कड्यावरुन दीडशे ते दोनशे मीटर खोल दरीमध्ये पडली. त्याठिकाणी कड्याच्या वर एका ठिकाणी एक बॅग आणि चप्पल आढळून आल्यानं तेथील एका व्यावसायिकानं लोणावळा ग्रामीण पोलिसांना ही माहिती कळवली.