मुंबई Lok Sabha Election 2024 : सकाळपासून हिरानंदानी येथील बुथ क्रमांक 27 वर गर्दी असल्याच्या बातम्या येत होत्या. मात्र, या ठिकाणी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास तेथील ईव्हीएम (EVM Machines) बंद पडली होती. ती मशीन दुरुस्त करण्यासाठी इंजिनीयर येईपर्यंत काही वेळ लागला होता. त्यामुळं गर्दी वाढली होती. मात्र, त्यानंतर मशीनची तपासणी केल्यानंतर त्यांनी ईव्हीएम मशीन बदलली आणि त्या ठिकाणी सुरळीतपणे मतदान पार पडलं. त्यामुळं तिथे कोणतीही समस्या राहिली नसल्याची माहिती, उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी सोनाली मुळे (Election Officer Sonali Mule) यांनी दिली.
सर्वांना मतदानाची संधी उपलब्ध: मुंबईतील सहा मतदारसंघात आज लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात मतदान पार पडलं. हिरानंदानी येथे निवडणूक यंत्रणेकडून ईव्हीएम मशीन बदलण्यात आली. सहा वाजेपर्यंत जे मतदार तिथे असतील त्या सर्वांना मतदानाची संधी उपलब्ध करुन देण्यात आली. तसेच त्याबाबतच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या होत्या. एकही मतदार मतदानापासून वंचित राहणार नाही, याची ग्वाही निवडणूक निर्णय अधिकारी सोनाली मुळे यांनी दिली होती.