छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) :विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं जिल्ह्यात येणाऱ्या आणि जाणाऱ्या प्रत्येक वाहनाची तपासणी केली जात आहे. यात राज्यात अनेक ठिकाणी निनावी रोकड निवडणूक आयोगानं जप्त केली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील निल्लोड येथे निवडणूक आयोगाच्या पथकानं एका वाहनातून तब्बल 19 कोटी रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने ताब्यात घेतले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, हे दागिने जळगाव येथील एका सोने व्यापाऱ्याचे आहेत. त्याबाबत संबंधित व्यापाऱ्याला व्यवहाराचे तपशील घेऊन बोलावण्यात आलं आहे. त्यानंतर पुढील कारवाई होईल, अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली आहे.
19 कोटींचे सोन्या-चांदीचे दागिने पकडले : निवडणुकीच्या काळात जिल्ह्यात येणाऱ्या प्रत्येक वाहनाची कसून चौकशी करण्यात येत आहे. जिल्ह्यात या अगोदर चाळीस लाखांची रोकड तपासणीत आढळून आली होती. त्यानंतर आता शहरातील जळगावकडं जाणाऱ्या एका गाडीमध्ये 19 कोटी रुपयांचे सोने चांदीचे दागिने आढळून आले आहेत. ही कारवाई गुरुवारी (14 नोव्हेंबर) सायंकाळी निल्लोड येथे करण्यात आली. विधानसभा मतदारसंघ क्षेत्रात सात ठिकाणी वाहन तपासणीसाठी स्थिर पथकांची स्थापना करण्यात आली आहे. यापैकी एक असलेल्या निल्लोड फाट्यावर असलेल्या सिल्लोड येथील स्थिर पथकाचे सहायक गटविकास अधिकारी दादाराव अहिरे, आर. पी. गावंडे, एस. एस. भालेराव, संतोष पवार, आदींनी संभाजीनगरकडून जळगावकडं जाणाऱ्या वाहनाची तपासणी केली असता त्यांना यात 19 कोटी रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने सापडले.
दागिन्यांचे कागदपत्र तपासणार : जप्त केलेले दागिने जळगाव येथील एका नामांकित सराफा व्यावसायिकाचे असल्याची माहिती सहायक गट विकास अधिकारी अहिरे यांनी दिलीय. पथकानं दागिने जप्तकरुन ते जीएसटी पथकाच्या स्वाधीन केले आहेत. तर दागिन्यांची वाहतूक करणारे वाहन रात्री उशिरा शासकीय तंत्रनिकेतन कार्यालय येथे स्थापन करण्यात आलेल्या कार्यालयात आणण्यात आले. दागिन्यांच्या व्यवहाराचा तपशील तपासला जाणार आहे. त्यासाठी संबंधित व्यापाऱ्याला बोलावण्यात आलं असून त्यानंतर पुढील कारवाई होईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिलीय.
हेही वाचा -
- कोल्हापूर परिक्षेत्रात आचारसंहिता काळात सापडलं २० कोटींचं घबाड; रोख रक्कम, दागिने जप्त
- नागपुरात पोलिसांनी जप्त केली १ कोटी ३५ लाखांची रोकड, दुचाकीस्वाराला घेतलं ताब्यात
- भिवंडीत वाहन तपासणीवेळी आढळली २ कोटी ३० लाख रुपयांची रोकड, भरारी पथकानं केली जप्त