मुंबई -लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेला चांगले यश मिळाल्यानंतर आता त्यांनी मुंबई महापालिकेसह राज्यातील अन्य पालिका निवडणुकीवरती लक्ष केंद्रित केलंय. याचाच एक भाग म्हणून विशेषतः मुंबई महापालिकेवर शिवसेनेने लक्ष्य दिल्याचं पाहायला मिळतंय. कारण यावेळी मुंबई पालिकेवर कोणत्याही परिस्थितीत भगवा फडकवायचा, असा इरादा शिवसेनेचा दिसत आहे, तर दुसरीकडे भाजपासुद्धा मुंबई पालिका निवडणुकीत विजय मिळवायचा म्हणून मागील कित्येक महिन्यांपासून तयारी करीत आहे. तर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महापालिका निवडणुकीची तयारी जोरात सुरू केली असून, भाजपाला आव्हान देण्यासाठी आणि शिवसेना (ठाकरे) यांची 25 वर्षांची सत्ता उलथवून टाकण्याचे लक्ष्य ठेवलंय. शिंदे प्रत्येक प्रभागातील विकासकामांचा वैयक्तिक आढावा घेणार आहेत, त्यामुळे भाजपा, तसेच शिंदे यांची शिवसेना आणि ठाकरे यांची शिवसेना यांच्यासाठी मुंबई महापालिका निवडणूक ही प्रतिष्ठेची लढत होणार असल्याचं बोललं जातंय.
लोकसभा अन् विधानसभा निवडणुकीमुळे आत्मविश्वास दुणावला : यावर्षी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका पार पडल्यात. मूळ शिवसेनेतून एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर ते पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या निवडणुकीला सामोरे गेले आहेत. लोकसभा निवडणुकीत एकनाथ शिंदेंना अपेक्षापेक्षा चांगले यश मिळाले तर विधानसभा निवडणुकीत त्यांनी 57 आमदार निवडून आणले. एकनाथ शिंदे यांना 30 ते 40 जागा मिळतील, असं राजकीय विश्लेषक, तज्ज्ञ आणि जाणकार म्हणत होते. पण या सर्वांचा अंदाज फोल ठरवत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने मुसंडी मारत पहिल्याच विधानसभा निवडणुकीत 57 जागांवर विजय मिळवला. त्यामुळे शिवसेनेतील नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचा कमालीचा आत्मविश्वास दुणावला असून, आगामी होणाऱ्या पालिका निवडणुकीतदेखील आपला विजय नक्की आहे. म्हणून कामाला लागण्याच्या सूचना शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांनी नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी दिल्या आहेत.
रणनीती काय?
- केलेली विकास कामे तळागाळातील मुंबईकरापर्यंत पोहोचवणार
- मुंबईतील प्रत्येक वॉर्डामध्ये एकनाथ शिंदे वैयक्तिक पातळीवर आढावा घेणार
- मतदारांना विश्वासात घेऊन वॉर्डामधील विकासकामांना प्राधान्य देणार
- पक्षाची कामं आणि योजना मुंबईकरांपर्यंत पोहोचवणार
- जे नवमतदार आहेत, त्यांच्यापर्यंत कार्यकर्त्यांनी पोहोचून, त्यांचे मतदार यादीत नाव आहे की नाही? याची पडताळणी करणार
- प्रभागातील लोकांचे प्रश्न, समस्या या सोडवण्यावर भर द्या