मुंबई Loan Waiver For Farmers :शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. तेलंगणा राज्यातील सरकारने शेतकऱ्यांसाठी 31 हजार कोटीची कर्जमाफी केली आहे. तेलंगणाच्या धर्तीवर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार असल्याचं बोललं जातंय. महाराष्ट्रातसुद्धा दोन वेळा शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली आहे. आता आगामी काळात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महायुती सरकार राज्यातील शेतकरी कर्जमाफी करणार असल्याची शक्यता आहे. शेतकरी कर्जमाफीचा निर्णय सरकार घेऊ शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
जाचक अटीमुळे शेतकरी वंचित :महाराष्ट्रात याआधी दोन वेळा शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचा निर्णय घेण्यात आलाय; मात्र कर्जमाफीपासून अनेक पात्र शेतकऱ्यांना वंचित राहावे लागले होते. अनेक जाचक अटी, नियमांमुळे शेतकरी त्रस्त झाले होते. वारंवार सरकारी कार्यालयात खेटे मारणे, सतत अपुरी कागदपत्रं आहेत असे कारण सांगणे, पात्र असतानाही अपात्र ठरवणे, या सर्वांला शेतकरी कंटाळले होते. त्यामुळं तेव्हा अनेक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता आला नव्हता. हा घोळ आधी सरकारने दूर करावा, असं अखिल भारतीय किसान सभेचे केंद्रीय सहसचिव, अजित नवले यांनी म्हटलं आहे. तसेच सध्या वाढत जाणाऱ्या शेतकरी आत्महत्या आणि दुष्काळामुळं शेतकरी अडचणीत असताना राज्यात सरकारने शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची योजना आणावी; पण कर्जमाफीचा निर्णय होत असताना यामध्ये पारदर्शकता झाली पाहिजे आणि राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला पाहिजे, अशी किसान सभेची मागणी असल्याचं अजित नवले यांनी म्हटलं आहे.