ठाणे (डोंबिवली)Dombivli MIDC Blast: डोंबिवली एमआयडीसीत केमिकल कंपनीमध्ये मोठा स्फोट झाल्याची धक्कादायक घटना घडलीय. स्फोटानंतर कंपनीत भीषण आग लागली. यात आठ जणांचा मृत्यू झाला आहे. तर स्फोटात 64 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. आगीनंतर धुराचे लोट दूरवरुनही पाहायला मिळत होते. परिसरातील इमारतींच्या काचाही फुटल्याची माहिती आहे. या घटनेमुळं डोंबिवली भागात खळबळ उडाली असून भीतीचं वातावरण पसरलंय.
डोंबिवली येथे केमिकल कंपनीला भीषण आग (Dombivli Reporter) मुख्यमंत्र्यांनी केली घटनास्थळाची पाहणी :डोंबिवली एमआयडीसी परिसरातील केमिकल कंपनीमध्ये झालेल्या स्फोटात 8 जण ठार तर 64 जण जखमी झाले आहेत. या ठिकाणाहून अग्निशमन दलाने 8 जणांचे जळालेल्या अवस्थेतील मृतदेह बाहेर काढले आहेत. तसंच या दुर्घटनेतील नुकसानग्रस्तांना एक आठवड्याच्या आत नुकसान भरपाई देण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. डोंबिवली एमआयडीसी परिसरातील अतिधोकादायक केमिकल कंपन्या शहराबाहेर स्थलांतर करण्याबाबत शासन स्तरावर नक्कीच निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली. यातील जखमींवर एम्स आणि नेपच्युन या खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू असल्याचे समजते. तर अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींची नावे अद्याप समजू शकलेली नाहीत.
पाच लाख रुपयांची मदत जाहीर :डोंबिवली केमिकल स्फोटातील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्येकी पाच लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. तसंच जखमींच्या उपचाराचा खर्च राज्य सरकार करणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. मुख्यमंत्री शिंदे यांनी गुरुवारी रात्री आठ वाजता दुर्घटनास्थळाची पाहणी करत आढावा घेतला.
अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल :स्फोटामुळं अनेक वाहनांचं आणि घरांचं नुकसान झालं आहे. तर घटनास्थळी आगीवरती नियंत्रण मिळवीण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. एमआयडीसी अग्निशमन दलाचे जवान दोन फायर वाहनासह उपस्थित आहेत. तसेच डोंबिवली अग्निशमन दलाचे जवान एक फायर वाहनासह उपस्थित आहेत. कल्याण (पु.) अग्निशमन दलाचे जवान एक फायर वाहनासह उपस्थित आहेत. कल्याण (प.) अग्निशमन दलाचे जवान दोन फायर वाहनासह उपस्थित आहेत. पलावा एमआयडीसी अग्निशमन दलाचे जवान एक फायर वाहनासह उपस्थित आहेत. ठाणे अग्निशमन दलाचे जवान एक हायराईज फायर वाहनासह उपस्थित आहेत.
महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील एका केमिकल फॅक्टरीत बॉयलरचा स्फोट होऊन लागलेल्या आगीच्या दुर्घटनेत अनेकांचा मृत्यू झाल्याची बातमी अत्यंत दु:खद आहे. मी शोकग्रस्त कुटुंबांप्रती मनापासून संवेदना व्यक्त करते. सर्व जखमींनी लवकरात लवकर बरे होण्याची प्रार्थना मी करते. - द्रौपदी मुर्मू - राष्ट्रपती
डोंबिवलीत पुन्हा प्रोबेसची पुनरावृत्ती : 16 मे 2016 रोजी डोंबिवलीत प्रोबेस कंपनीत स्फोट होऊन 12 जणांचा मृत्यू झाला होता. तर दोनशेच्यावर नागरिक जखमी झाले होते. नागरिकांच्या करोडो रुपयांचं मालमत्तेचं नुकसान झालं होतं. आज तिच पुनरावृत्ती डोंबिवली एमआयडीसी फेज दोन मधील अंबर केमिकल्समध्ये स्फोट होवून झालीय. त्यावेळी प्रोबेस स्फोटाची चौकशी समिती नेमली होती. तो अहवाल जनतेसमोर आणण्यात आलाच नाही आणि त्यातील सूचनांची अंमलबजावणी करण्यात आली नाही. आता पुन्हा तेच तेच चौकशा समित्या नेमणार हे नक्की. प्रोबेस स्फोटातील नुकसान झालेल्या मालमत्ता धारकांना आणि काही जखमी होऊन जायबंदी झाले होते, त्यांनाही अद्याप नुकसान भरपाई मिळाली नाही.
डोंबिवली एमआयडीसीत केमिकल कंपनीमध्ये मोठा स्फोट झाला. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांशी बोलणं झालेलं आहे. घटनास्थळी रेस्क्यू टीम , जिल्हाधिकारी , खासदार तिथे पोचले आहेत. त्या ठिकाणी सर्व परिस्थिती कंट्रोलमध्ये आहे. - एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री
नागरिकांचा सुरक्षेचा प्रश्न: आज झालेल्या स्फोटानं अनेक इमारतींचं नुकसान झालंय. इमारतींना स्फोटाचा वेळी मोठे हादरे बसले. एमआयडीसी फेज मधील म्हात्रे पाडा, रिजेंसी इस्टेट, एमआयडीसी निवासी, सोनार पाडा इत्यादी भागात नुकसान झालंय. सदर भागात काही लोखंडी भागांचे अवशेष पडल्याचं दिसत आहे. स्फोट झालेल्या परिसरातील नागरिक भयभयीत झाले असून असं काही महिन्याच्या अंतरानं दुर्घटना होत असल्यानं नागरिकांचा सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालाय. एमआयडीसी मधील अती धोकादायक कंपन्या त्वरित येथून हलविण्यात याव्यात, अशी येथील जनतेची मागणी आहे.
डोंबिवली एमआयडीसीतील अमुदान केमिकल कंपनीत बॉयलरचा स्फोट झाल्याची घटना दु:खद आहे. 8 जण या घटनेत अडकले होते. त्यांना बाहेर काढण्यात आले आहे. जखमींच्या उपचाराची व्यवस्था करण्यात आली असून आणखी रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकार्यांशी माझी चर्चा झाली असून, तेही घटनास्थळी पोहोचत आहेत. एनडीआरएफ, टीडीआरएफ, अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले आहे. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. - देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री
स्फोटाचा हादरा दीड किलोमीटरपर्यंत बसला : केमिकल कंपनीमध्ये दुपारी एकच्या सुमारास स्फोट झाला. स्फोट झाल्यानंतर जवळच्या कंपन्यांनाही आग लागल्याचं समोर आलं. हा स्फोट इतका भीषण होता की हवेत धुराचे लोळ दिसत होते. आजूबाजूलाही काही दिसत नव्हतं. या स्फोटामुळं दीड किलोमीटर परिसर हादरुन गेला, दीड किलोमीटरमधील गाड्यांच्या आणि बिल्डिंगच्या काचा फुटल्या आहेत. लोक भूकंप आल्याप्रमाणे पळत होते. आजुबाजूच्या परिसरातील एकाही सोसायटीच्या काचा राहिलेल्या नाहीत, सगळ्या काचा तुटून गेल्या आहेत. बॉयलर्सचे जे तुकडे उडाले ते दीड किलोमीटर अंतरावर पडले. हे तुकडे चारचाकी गाड्यांवर पडून गाड्या दबल्या आहेत, अशी माहिती स्थानिक रहिवाशी संजय चव्हाण यांनी दिलीय.
जवळच्या तीन कंपन्यांनाही लागली आग? : केमिकल कंपनीच्या बॉयलरच्या स्फोटाचा आवाज 3 किलोमीटरपर्यंत ऐकू आला. बॉयलर्सचे तुकडे दीड किलोमीटर अंतरावर पडलेत, सगळ्या सोसायट्यांमधील इमारतींच्या काचा फुटल्या आहेत, अशी माहिती स्थानिकांनी दिली. इतकेच नाही तर स्फोटानंतर ही आग जवळच्या तीन कंपन्यांपर्यंत पसरली आहे. या घटनेतील जखमींवर डोंबिवलीच्या एम्स रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
लहान स्फोट सुरूच : डोंबिवली एमआयडीसीतील कंपनीच्या परिसरात धुराचे लोट आणि आगीची तीव्रता इतकी जास्त आहे की, अग्निशमन दलाच्या जवानांना कंपनीच्या गेटवरुनच पाण्याचा मारा करावा लागत आहे. कंपनीत अजूनही रसायनांचे अनेक ड्रम आहेत. आगीमुळं या ड्रमचा स्फोट होत आहे. त्यामुळं आग कमी होताना दिसत नाही. आगीची धग कमी झाल्याशिवाय अग्निशमन दलाला आतमध्ये शिरता येणं शक्य नाही.
हेही वाचा -
- Gelatin Explosion Satara : साताऱ्यातील परळी वन परिमंडळ कार्यालयात जिलेटिनचा भीषण स्फोट; वन विभागात खळबळ
- चाकण-शिक्रापूर मार्गावर गॅस टँकरचा भीषण स्फोट, एक किलोमीटरपर्यंत हादरे बसले! - Gas Tanker Explosion
- सिलेंडर स्फोटानं नागरिक हादरले; चिमुकलीचा मृत्यू, तर पाच जण जखमी - Girl Died In Cylinder Blast