पुणे :काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या दिवाळीत लक्ष्मीपूजन कधी करायचं? याबाबत अनेक पंचांगकर्त्यांमधेच संभ्रमाची स्थिती निर्माण झालीय. अनेक पंचांग आणि कॅलेंडरमध्ये लक्ष्मीपूजन 1 नोव्हेंबरलाच होत असल्याची नोंद आहे. मात्र, राज्यातील काही भागात 31 ऑक्टोबर रोजी तर काही भागात 1 नोव्हेंबर रोजी नागरीकांनी लक्ष्मीपूजन करावं, असं आवाहन पंचांगकर्ते गौरव देशपांडे यांनी केलं.
लक्ष्मीपूजन कधी करता येणार? : याविषयी अधिक माहिती देताना गौरव देशपांडे म्हणाले, "सर्व प्रमुख पंचांगांमध्ये यावर्षी लक्ष्मीपूजन हे 1 नोव्हेंबर या एकाच दिवशी असल्याचं नोंदवल्यानं या संदर्भात संभ्रमाची परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक पंचांगात व कॅलेंडरमध्ये धर्मशास्त्रातील वचनांचा, चुकीचा अर्थ काढून फक्त 1 नोव्हेंबर या एकाच दिवशी लक्ष्मीपूजन दिलेलं आहे. मात्र, धर्मशास्त्रात सांगितलेल्या वचनाचा नीट अर्थ लावला, तर यावर्षी 31 ऑक्टोबर व 2 नोव्हेंबर अशा दोन्ही दिवशी लक्ष्मीपूजन करता येणार."
" 'निर्णयसिंधूत 'दण्डैकरजनीयोगे दर्शः स्यात्तु परेऽहनि । तदा विहाय पूर्वेद्युः परेऽन्हि सुखरात्रिका ।।' अर्थात जेव्हा दोन दिवस अमावास्या प्रदोषकाळात विद्यमान असेल, तेव्हा सूर्यास्तानंतर 1 दंड म्हणजे 1 घटिका अर्थात् 24 मिनिटं किंवा त्यापेक्षा जास्त अमावास्या असल्यास त्याच दिवशी म्हणजे 1 नोव्हेंबर रोजी लक्ष्मीपूजन करावं. सूर्यास्तानंतर 24 मिनिटांपेक्षा कमी अमावास्या असल्यास आदल्या दिवशी म्हणजे 31 ऑक्टोबर रोजी लक्ष्मीपूजन करावं असं दिलंय. त्यानुसार राज्यातील काही भागात 31 ऑक्टोबर तर काही भागात 1 नोव्हेंबर अशा दोन्ही दिवशी लक्ष्मीपूजन करता येणार आहे," असं देशपांडे यावेळी म्हणाले.