ठाणे : भारतात साजरा केला जाणारा सर्वात मोठा सण म्हणजे 'दिवाळी' आहे. दरवर्षी आश्विन आणि कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावास्येला दिवाळीचा सण साजरा केला जातो. दिवाळीला दीपावली असंही म्हणतात. दरम्यान, अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठांमध्ये विविध नाविन्यपूर्ण विद्युत रोषणाई दाखल व्हायला सुरुवात झाली आहे.
विविध प्रकारचे आकाशकंदील : दरवर्षी बाजारपेठेत चायनामेड वस्तूंचा बोलबाला दिसून येतो. परंतु, यंदा बाजारपेठेत 'मेड इन इंडिया' विद्युत रोषणाईची तसंच आकाशकंदीलांची मोठी मागणी आहे. तसंच मेटॅलिक, रंगीबेरंगी कापडी आणि कागदी कंदील, हॅलोग्राफी कंदील, मार्बल पेपर कंदील, फोल्डिंगचे कंदील, साडीचे आणि खणाचे आकाशकंदील यांनाही ग्राहकांची पसंती मिळत आहे. आतापर्यंत चिनी बनावटीची विद्युत रोषणाई आणि आकाशकंदीलांची मोठ्या प्रमाणात विक्री होत होती. याचा थेट फायदा चिनी अर्थव्यवस्थेला होत होता. परंतु, सरकारच्या 'मेक इन इंडिया' धोरणाचा फरक आता प्रकर्षानं जाणवू लागलाय.