नाशिकHusband Wife Dispute :पत्नीने पतीला तुम्ही कोणाशी व्हिडीओ कॉलवर बोलत आहात, असे विचारल्याचा राग आल्याने पतीने पत्नीच्या गालावर जोरदार चावा घेतला. यात पत्नी गंभीर जखमी झाली असून या विरोधात पती, सासू-सासरे यांच्या विरोधात पत्नीने भद्रकाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
पत्नीला उपाशीपोटी घरात डांबले :पोलिसांनी दिलेल्या माहिती आणि पीडित विवाहितेने दिलेल्या तक्रारीनुसार पती सुरेश (नाव बदललेले) यांच्यासोबत 2023 मध्ये लग्न झाले आहे. पती कोणासोबत तरी व्हिडिओ कॉलवर बोलत असताना पत्नीने पाहिले. याबाबत तिने त्याला विचारणा केली असता संशयित पतीचा संताप अनावर झाला आणि त्याने तिला बेदम मारहाण करत तिच्या गालावर जोरात चावा घेतला. यात ती गंभीर जखमी झाली सासू-सासर्यांनी ही मध्यस्थी न करता आपल्या मुलाचीच बाजू घेतली आणि तिचा शारीरिक, मानसिक छळ केला. पतीने रात्री मारहाण करत पत्नीला उपाशी पोटी घरात डांबून ठेवले आणि नंतर घराबाहेर काढले. या प्रकरणी पत्नीने नाशिकच्या भद्रकाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.