सागर पाटील, पोलीस उपायुक्त अमरावती अमरावती Dispute in Amravati : अमरावती महापालिकेच्या वतीनं शहराच्या विविध भागात लागलेले झेंडे काढण्याची मोहीम राबविली जात आहे. आमचा झेंडा काढला. त्यांचा झेंडा का काढला नाही, असा वाद फ्रेजरपुरा परिसरातील सरदार चौक परिसरात उफाळून आल्यामुळं मंगळवारी रात्री दोन गटात तणाव निर्माण झाला होता. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्तांनी घटनास्थळी धाव घेतली. काही वेळातच संपूर्ण परिसरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आलाय.
फ्रेजरपुरा परिसरात दोन गट आमने सामने : सोमवारी अयोध्येच्या राम मंदिरात श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा केली जात असल्यामुळं अमरावती शहरातील जुन्या महामार्गावर फ्रेजरपुरा परिसरात मोठ्या संख्येनं झेंडे लावण्यात आले होते. या भागात अनेक दिवसांपासून इतरही झेंडे फडकत आहेत. दरम्यान सोमवारी शहरात ज्या भागात वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ शकतो अशा भागातील होर्डिंग, पोस्टर आणि झेंडे काढण्याची मोहीम महापालिका प्रशासनानं राबविली. यातच फ्रेजरपुरा परिसरातील एक झेंडा महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी काढला. त्यावरून काही तरुणांनी वाद घातला. यामुळं परिसरातील दोन गट आमने-सामने उभे ठाकल्यामुळं तणाव निर्माण झाला होता.
पोलिसांकडून शांततेचं आवाहन : फ्रेजरपुरा परिसरात मंगळवारी रात्री दोन गटात तणाव निर्माण झाला असताना पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त या भागात लावण्यात आलाय. शहराच्या विविध भागात जे झेंडे लागले आहेत ते काढण्यासाठी महापालिका प्रशासनाच्या वतीनं कारवाई सुरू आहे. त्या अनुषंगानं फ्रेजरपुरा परिसरातदेखील पोलिसांच्या उपस्थितीत कारवाई सुरू असताना या ठिकाणी गर्दी जमली. याबाबत माहिती मिळताच आम्ही तात्काळ या ठिकाणी पोहोचलो. आमच्या आव्हानानुसार या भागातील गर्दी निवळली आहे. या भागातील रहिवाशांसह संपूर्ण अमरावती शहरातील नागरिकांना आम्ही शांततेचं आवाहन करतो, असं पोलीस उपायुक्त सागर पाटील माध्यमांशी बोलताना म्हणाले. अमरावती शहरात जे काही झेंडे फ्लेक्स बोर्ड लागले आहेत, ते आपापल्या हद्दीतील लोकांनी तात्काळ काढून घ्यावेत. त्यामुळं अशा स्वरुपाचा वाद उफाळून येणार नाही. सध्या शांतता आहे. समाज माध्यमांवर पसरणाऱ्या अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नये असंही आवाहनदेखील पोलीस उपायुक्तांनी केलंय.
हेही वाचा :
- मोठी बातमी! छ. संभाजीनगरात किरकोळ कारणावरून दोन गटात राडा, 64 जणांवर गुन्हा दाखल
- मिरारोडमध्ये तणावपूर्व शांतता; दोन गटातील वादानंतर तगडा बंदोबस्त, अफवांवर विश्वास न ठेवण्याचं पोलिसांचं आवाहन