मुंबई : केंद्रीय निरीक्षक विजय रुपाणी आणि निर्मला सीतारामण यांनी विधीमंडळ गटनेतेपदी आणि पर्यायानं मुख्यमंत्री पदाचा उमेदवार म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची बुधवारी घोषणा केली. त्यामुळे राज्याच्या मुख्यमंत्री पदावर देवेंद्र फडणवीस यांची निवड झाल्यानं राज्यातील महायुतीच्या नेत्यांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे. आज देवेंद्र फडणवीस हे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. शपथविधीचा हा सोहळा सायंकाळी 5.30 वाजता आझाद मैदानावर होणार आहे. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह अनेक दिग्गज नेते आणि मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी राहणार उपस्थित :देवेंद्र फडणवीस आज तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. त्यांच्या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह अनेक दिग्गज उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे मुंबई शहरात तगडी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. मुंबईतील वाहतूक व्यवस्थेतही मोठा बदल करण्यात आला आहे. शपथविधी सोहळ्यामुळे मुंबईतील वाहतूक इतर मार्गांवरुन वळवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागणार आहे.