नागपूर :Rashtriya Namo Yuva Maha Samelan in Nagpur : भारतीय जनता पक्षाकडून नागपूर येथे राष्ट्रीय नमो युवा महा-संमेलनाचं आज सोमवार (दि. 4 मार्च)रोजी आयोजन करण्यात आलं होतं. महा-संमेलनाच्या माध्यमातून भाजपने एका प्रकारे लोकसभा निवडणूकीच्या प्रचाराचा नारळ फोडला आहे. एकीकडे अद्याप भाजपने महाराष्ट्रातील उमेदवारांची यादीही जाहीर केलेली नाही. मात्र, प्रचाराचा शुभारंभ केला आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या आयोजित महासंमेलनात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, स्मृती इराणी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार तेजस्वी सुर्या यांनी यावेळी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केलाय. ज्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वक्षमतेवर प्रश्न उपस्थित केलं त्यांना जनतेने 2014 व 2019 मध्ये त्यांची जागा दाखवली असं स्मृती इराणी म्हणाल्या आहेत. तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सलग तिसऱ्यांदा देशाचा पंतप्रधान बनवण्यासाठी देशातील युवा नागपूर येथे एकत्रित झाल्याचा आनंद वाटतं असल्याचं मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व्यक्त केलं आहे.
देश अंध:कारातून विकासाकडे :मोदी सरकारच्या काळात गरिबांची बॅंक खाती उघडली, महिलांना सन्मान मिळाला, 80 कोटी नागरिकांना मोफत धान्य मिळालं, जम्मू काश्मीर 370 कलममधून मुक्त झालं, अयोध्येत रामललाची प्राणप्रतिष्ठा झाली. देशात पायाभूत सुविधा, रोजगार मोठ्या प्रमाणात निर्माण झाले. काॅंग्रेस सरकारने दरम्यान, एवढी वर्ष निर्माण केलेल्या अंध:कारातून देश आता विकासाकडे निघाला आहे, असं मत केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्री स्मृती इराणी म्हणाल्या आहेत.
विदर्भातील शेतकरी सुवर्ण भविष्य बघतोय :इराणी यांनी यावेळी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांना थेट आवाहनचं दिलं. राहुल गांधी यांनी मैदान निवडावं. भारतीय जनता पक्षाचा साधारण कार्यकर्ता पंतप्रधान नरेंद्र मोदीनी 10 वर्षात केलेल्या कामावर चर्चा करायला तयार आहे अस आव्हान त्यांनी यावेळी दिलं आहे. तसंच, विदर्भाला तेव्हा पाहिले जेव्हा या विदर्भातील शेतकरी आत्महत्या करत होते. युवा वर्ग भविष्याला घेऊन चिंतित होते. आज मात्र, शेतकऱ्यांना वार्षिक 6 हजार रुपये थेट खात्यात मिळतात. आपल्या शेतातील पिकातून शेतकरी सुवर्ण भविष्य पाहत असल्याचंही इराणी यावेळी म्हणाल्या आहेत.
इंदिरा गांधीचे स्वप्न मोदींनी पूर्ण केलं : नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान का बनवावं याची अनेक कारणं आहेत. इंदिरा गांधी यांनी गरिबी हटावचे नारे दिले. गरिबी दूर झाली नाही. राजीव गांधी 1 रुपया पाठवायचे तर तो गरीब जनतेपर्यंत पोहचत नसे. मोदीनी ना खाऊंगा, ना खाणे दुंगा अस सांगितलं. गरिबांच्या ताटात आता कोणाचा वाटा नाही. गरिबी हटाव नारा इंदिरा गांधीने दिला, पण ते स्वप्न मोदीनी पूर्ण केलं असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केला.
अर्थशास्त्री विचारात पडले आहेत :नवं शिक्षण धोरण मोदींनी देशाला दिल. फक्त डिग्री नाही तर कौशल्य प्राप्त करून अर्थार्जन करणारं शिक्षण तरुणांना दिलं. इंग्रजांची भाषा नाही तर आता आपल्या मातृभाषेत डॉक्टर, इंजिनिअर होता येणार आहे. जागतिक मंदी असताना भारतात मंदीचा प्रभाव दिसत नाही, याचा अर्थशास्त्री विचार करत असल्याचं ते म्हणाले आहेत. भारत जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था होणार आहे. अर्थव्यवस्था मोठी होते तेव्हा नोकरी, रोजगार मिळतो. स्वप्न पूर्ण करायला पंख लागतात. देशातील काळा पैसा संपवला. जीएसटी आणून नवीन अर्थचक्र ही सुरू केलं असही फडणवीस यावेळी म्हणाले आहेत.