मुंबई- हरियाणा विधानसभा निवडणूक भारतीय जनता पक्षाने जिंकली असून, आता पुढची सलामी महाराष्ट्राची असेल. महाराष्ट्रात महायुतीचे सरकार निश्चित येणार असून, आता कोणीही अडवू शकत नाही, असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. हरियाणा विजयानंतर जल्लोष साजरा करताना ते मुंबईत बोलत होते. हरियाणा विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने विजय मिळवल्याबद्दल भारतीय जनता पक्षाच्या मुंबईतील कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी ढोल-ताशे वाजवून आणि फटाके फोडून जल्लोष साजरा केलाय. यावेळी महिला कार्यकर्त्यांनी फुगड्या घालून आपला आनंद व्यक्त केलाय. तसेच भाजपाचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना जोरदार टोले लगावले.
आता कसं वाटतंय? :हरियाणा राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा पराभव होईल आणि काँग्रेसचा विजय होईल, असे भाकीत महाविकास आघाडीचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केले होते. संजय राऊत यांच्या या वक्तव्याचा समाचार घेताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, एक व्यक्ती संध्याकाळी उठतो अन् काहीतरी तयारी करतो, मग सकाळी नऊचा भोंगा वाजवतो. या भोंग्याने केलेले भाकीत सपशेल खोटे ठरले असून, तो तोंडावर पडलाय. आता कसं वाटतंय? असा सवालही यावेळी खोचकपणे देवेंद्र फडणवीस यांनी राऊतांना विचारलाय.
फेक नरेटिव्हमुळे आमचा पराभव: खरं तर महायुती आघाडीला कोणीही हरवू शकत नाही. आमचा लोकसभेतला पराभव आमच्या विरोधकांनी केलेला नाही, तर तो चौथ्या पक्षाने म्हणजे फेक नरेटिव्हने केलाय. आता राहुल गांधी यांनाही कळून चुकलं असेल की, जनता कोणाच्या बाजूनं आहे. कितीही प्रयत्न केला आणि जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला तरी जनता आता ठामपणे भारतीय जनता पक्षाच्या आणि मित्र पक्षांच्या मागे उभी राहील, असा दावा यावेळी देवेंद्र फडणवीसांनी केलाय.
महाराष्ट्रात आमचाच विजय :हरियाणा येथील विजयानंतर आता नव्याने विरोधी पक्षनेते झालेल्या राहुल गांधींना आम्ही महाराष्ट्रात विजयाची दुसरी सलामी देणार आहोत. आता कुठलंही फेक नरेटिव्ह चालणार नाही आणि जनता कशालाच भुलणार नाही. त्यामुळे आता येत्या निवडणुकीत असं काहीही होणार नाही, महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत आमचा पक्ष निश्चितच विजयी होईल. जम्मू-काश्मीरमध्ये जरी आमचा पराभव झाला असला तरी आम्ही हे जगाला दाखवून देण्यात यशस्वी ठरलो आहोत की आम्ही जम्मू-काश्मीरमध्ये लोकशाही राबवतोय. लोकशाही राबवण्याची बाब आम्ही जगापुढे मांडली आहे आणि हाच आमचा विजय आहे, असंही यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणालेत.
आता कसं वाटतंय? देवेंद्र फडणवीसांचा हरियाणा विजयानंतर राऊतांना खोचक टोला - HARYANA ELECTION RESULTS 2024
भोंग्याने केलेले भाकीत सपशेल खोटे ठरले असून, तो तोंडावर पडलाय. आता कसं वाटतंय? असा सवालही यावेळी खोचकपणे देवेंद्र फडणवीस यांनी राऊतांना विचारलाय.
देवेंद्र फडणवीस (ETV Bharat File Photo)
Published : Oct 8, 2024, 6:24 PM IST