कोल्हापूर : देशाची धर्मसत्ता निश्चितपणे राजसत्तेवर कधीच अवलंबून राहिली नाही. धर्मसत्तेनं त्यांची स्वतंत्र व्यवस्था उभी केली आहे. सोबत राजसत्तेलाही मार्गदर्शन केलं असून संपूर्ण विश्वाच्या अस्तित्वाचं प्रश्नचिन्ह निर्माण झाल्यावर जैन विचार सर्वांसाठी मार्गदर्शक ठरेल. 'शिका, कमवा आणि समाजाला परत करा' ही जैन समाजाची शिकवण देशासाठी मार्गदर्शक ठरेल असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी काढले.
मठाला 'अ' वर्ग तीर्थक्षेत्र दर्जा लवकरच देणार : "देशाच्या जीडीपीमध्ये सर्वात मोठी हिस्सेदारी आणि काळ्या आईची सेवा करणारे जैन समाजाच्या बांधवांनी सर्व क्षेत्रात आपल्या कामाने ठसा उमटवला आहे. राज्यात तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाल्यानंतर 2 हजार वर्षांचा इतिहास असलेल्या आणि जैन समाजाचं धार्मिक केंद्र ठरलेल्या नांदणी गावात यायची संधी मिळाली. या समाजाने देशाला अहिंसेची शिकवण दिली. तर जो जन्माला आला आहे तो जगेल, समाज त्याला जगवेल असा जैन समाजाचा उपदेश आचार्य विषुद्य महाराज यांनी देशाला दिला". कोल्हापूर सांगली आणि सीमा भागातील 743 गावांना जैन धर्माबद्दल मार्गदर्शन करणाऱ्या या मठाला 'अ' वर्ग तीर्थक्षेत्र दर्जा लवकरच देणार असल्याची घोषणाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केली. अलमट्टीबाबत समिती नेमली आहे, अलमट्टी धरणाच्या उंचीबाबत सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढा देण्याची आमची भूमिका असल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले.
प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (ETV Bharat Reporter)
मुख्यमंत्र्यांना प्रजा गर्क पदवी प्रदान: एक ते नऊ जानेवारी दरम्यान सुरू असलेल्या नांदणी येथील पंचकल्याणक प्रतिष्ठा आणि महामस्तकाभिषेक महोत्सवाला उपस्थित राहिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सकल जैन समाज आणि जिनसेन पठारक पट्टाचार्य महास्वामी संस्थांच्यावतीनं 'प्रजा गर्क पदवी' बहाल करण्यात आली.
बीड प्रकरणात मागे हटलो नाही, हटणार नाही: चीनमध्ये पसरलेला HMPV विषाणू महामारीवर फडणवीस म्हणाले, "प्राथमिक माहितीनुसार हा व्हायरस नवीन नाही. यापूर्वी देखील हा व्हायरस आलेला आहे. या व्हायरस संदर्भात ज्या काही मार्गदर्शक सूचना आहेत त्या लवकरच जारी करण्यात येतील. केंद्र सरकारचं आरोग्य मंत्रालय सर्व राज्यासोबत बैठक घेणार आहे. लगेच सर्वांनी घाबरून जाण्याची आवश्यकता नाही. आज राज्यातील आरोग्य विभागाची बैठक झाली आहे. केंद्रीय आरोग्य विभागाची बैठकदेखील सुरू आहे." तर बीड प्रकरणावर बोलताना ते म्हणाले, "या सर्व केसमध्ये राज्य सरकारनं चांगल्या पद्धतीनं कारवाई केलेली आहे. आम्ही कुठेही मागे हटलेलो नाही, मागे हटणार नाही आणि कोणाला सोडणार नाही. कोणी कोणाला धमकी देण्याचा प्रयत्न केला तर त्याला देखील सोडणार नाही".
हेही वाचा -
- संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे असल्यास त्यांच्यावरही कारवाई करणार- मंत्री संजय शिरसाट
- संतोष देशमुख हत्येप्रकरणी राज्यपालांनी हस्तक्षेप करून मुंडेंचा राजीनामा घ्यावा, सर्वपक्षीय शिष्टमंडळाची राज्यपालांकडे मागणी
- मुंडे यांच्या राजीनाम्याकरिता सर्वपक्षीय शिष्टमंडळानं घेतली राज्यपालांची भेट; छगन भुजबळ म्हणाले,"कुणाची बाजू.."