पिंपरी चिंचवडDevendra Fadnavis News :राज्यात सांडपाणी मैला- रसायनमिश्रीत दुषित पाणी अत्याधुनिक पद्धतीनं प्रक्रिया करुन सिंचनाला देण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येणार आहे. नागपूरच्या धर्तीवर मोशी कचरा डेपोवरील लिगसी वेस्टला ‘वेल्थ’मध्ये परावर्तीत करण्यासाठी पुढाकार घेणार आहोत. बायोमायनिंगच्या माध्यमातून कचराच्छादित जमीन मोकळी केली जाणार आहे. नदी-नाल्यांचं प्रदूषण रोखण्यासाठी सांडपाणी स्वच्छ करण्याचा प्रयत्न आहे. सांडपाणी थेटपणं नदीत सोडता येणार नाही, असं सरकारचं धोरण आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
‘नटसम्राट’ कोण हे जनता जाणते :संत तुकाराम महाराज यांच्या नावानं नाट्यगृह सुरू होत आहे. या माध्यमातून चांगलं व्यासपीठ निर्माण झालं आहे. ही जगद्गुरू तुकाराम महाराज यांना दिलेली वंदना आहे. पण, सध्या राज्यात नाट्यगृहाबाहेरील नाटकांची चर्चा अधिक आहे.‘‘गाढवाचे अंगी चंदनाची उटी । राखेसवे भेटी केली तेणें ॥’’ या जगद् गुरू संत तुकाराम महाराज यांच्या अभंगाप्रमाणे राज्याच्या राजकारणात कोण अंगाला राख लावून घेत आहे, हे लोकांना माहिती आहे. मनातील कथा ही कथाकथन करीत आहेत. संशयकल्लोळ सुरू आहे. नटसम्राटासारखे वागलं म्हणून नटसम्राट होत नाही. त्यामुळं चुकीचं वागल्यास कट्टयार काळजात घुसणार आहे. त्याची वेदनाही सहन करावी लागणार आहे. आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डंपर पलटी केलाच आहे, असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना लगावला आहे.
फडणवीस यांच्या हस्ते विकासकामांचं लोकार्पण :पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीनं चिखली येथील आरक्षण क्र. १/१६ येथे उभारण्यात आलेल्या नवीन टाऊन हॉलसह तब्बल 1 हजार 50 कोटी रुपयांहून अधिक विकासकामांचं लोकार्पण देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी फडणवीस म्हणाले, " महिलांच्या हातांना काम देण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शक्ती वंदना उपक्रम हाती घेतला. याद्वारे अर्थचक्रामध्ये महिलांचं योगदान घेण्याचा प्रयत्न केला. शहर चांगलं करायचं असेल, तर रस्ते, पाणी आणि अन्य पायाभूत सोयी-सुविधा प्रकल्पांना प्राधान्य दिलं जात आहे. प्रशासन आणि लोकप्रतिनिधी दोन्ही चाकांनी चांगले काम करीत प्रकल्पांना गती देण्याचं काम केलं, असं फडणवीस म्हणाले. तसंच, पिंपरी-चिंचवड शहराची ओळख पुण्याच्या छायेतील शहर अशी न राहता आंतरराष्ट्रीय पातळीवर शहराची स्वतंत्र ओळख निर्माण होणार आहे. त्यासाठी आणखी हजारो कोटी रुपयांची कामं आमदार महेश लांडगे घेवून आले तरी आम्ही करणार आहोत, अशी ग्वाही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.