पुणे - संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत २७ वर्षानंतर भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळताना पाहायला मिळत आहे. दिल्लीच्या या निकालाबाबत विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांना विचारलं असता ते म्हणाले की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा दिल्लीचं तख्त काबीज केलेले निकाल आपल्याला पाहायला मिळत आहेत. २७ वर्षानंतर दिल्लीत भाजपाचं आगमन होताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे सगळ्यांना आनंद होत आहे. याआधी संपूर्ण देशात भाजपा जिंकत असताना दिल्लीत पराभूत होत होता. हे शल्य भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या मनात होतं पण अतिशय चांगल्या पद्धतीनं संघटन मजबूत करत लोकांच्या हिताचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आणि लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास ठेवला, असं राम शिंदे म्हणाले.
विधान परिषदेचे सभापती राम शिंदे आज पुणे दौऱ्यावर होते. यावेळी त्यांना दिल्लीत लागलेल्या निकालाबाबत विचारलं असता त्यांनी आपलं मत व्यक्त केलं. 27 वर्षानंतर भाजपाला मिळालेल्या यशाचं श्रेय कोणाला याबाबत राम शिंदे यांना विचारलं असता ते म्हणाले की, हे श्रेय भारतीय जनता पक्ष तसंच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष यांचं असल्याचं यावेळी ते म्हणाले.