मुंबईPolitical Parties Manifesto:देशातील लोकशाहीचा सर्वांत मोठा उत्सव म्हणून लोकसभा निवडणूक प्रक्रियेकडे पाहिले जाते. त्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोग तयारीत असतो. लोकसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर सर्वच राष्ट्रीय, प्रादेशिक किंवा राज्यातील छोट्या पक्षांना वेध लागतात ते पक्ष जाहीरनामा म्हणजेच पार्टी अजेंडा प्रसिद्ध करण्याचे. निवडणूक जिंकण्यासाठी टर्निंग पॉईंट ठरत असतो तो जाहीरनामा. राष्ट्रीय पक्ष काँग्रेस आणि भाजपाने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. मात्र राज्यातील प्रादेशिक पक्षांचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला नाही. पहिल्या टप्प्यातील मतदान शुक्रवारी विदर्भात पार पडणार आहे. त्यामुळे राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, ठाकरे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध होणार की नाही, का होतोय विलंब यावर सध्या राज्यात चर्चा रंगू लागल्या आहेत.
जाहीरनाम्यांना विलंब : लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर पक्ष आपला जाहीरनामा प्रसिद्ध करीत असतो. मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी आणि निवडणूक जिंकण्यासाठी जाहीरनाम्याचा खूप महत्त्वाचा वाटा असतो. त्यामुळे प्रत्येक पक्ष आपल्या जाहीरनाम्यामध्ये पक्षाची भूमिका पक्षाची वाटचाल मतदारांना, जनतेला कशाप्रकारे फायद्याचा असू शकतो याचा विश्वास घोषणा पत्राच्या माध्यमातून देत असतो. देशातील राष्ट्रीय पक्ष भाजपा आणि काँग्रेस पक्षाने आपल्या पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला; मात्र राज्यातील महायुतीसोबत आणि महाविकास आघाडी सोबत असलेल्या अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा जाहीरनामा मात्र राज्यातील पहिल्या टप्प्यातील निवडणुका परवा होत असून तरी देखील जाहीर करण्यात आला नाही. त्यामुळे राज्यातील प्रादेशिक पक्ष आपला जाहीरनामा प्रसिद्ध करण्यासाठी इतका वेळ का घेताय अशा प्रकारचा प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे.
संयुक्तिक वचननामा लवकरच जाहीर होणार - उद्धव ठाकरे :पक्षाच्या जाहीरनाम्या संदर्भात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले की, महाविकास आघाडीचा जाहीरनामा अर्थात संयुक्त वचननामा लवकरच जाहीर करणार आहे. देशभरासाठी काँग्रेस पक्षाच्यावतीने जाहीर करण्यात आलेला जाहीरनामा हा सर्वसमावेशक आहे. त्या जाहीरनाम्यात काही गोष्टींचा समावेश करायचा असून त्यासह लवकरच संयुक्त वचननामा जाहीर करणार असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले.
लवकरच जाहीरनामा प्रसिद्ध होणार - संजू भोर पाटील :भाजपाने देश पातळीवर जाहीरनामा प्रसिद्ध केलाय. त्यात अनेक गोष्टींचा समावेश केला आहे. महाराष्ट्रात महायुती म्हणून शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर पक्षांचा काही मुद्द्यांचा समावेश असणार आहे. त्यामुळे राज्य स्तरावरील काही गोष्टींचा सामावेश करणारा महायुतीचा समन्वय साधणारा असा जाहीरनामा लवकरच प्रसिद्ध होईल, असं शिवसेना पक्षाचे नेते संजु भोर पाटील यांनी म्हटलं आहे.
जाहीरनामा प्रत्येक पक्षाने गंभीरतेने घ्यावा - हेमंत देसाई :निवडणूक जाहीरनामे महत्वाचे असतात हे आपल्या सर्वांना माहीत आहेत. त्या जाहीरनाम्यांना अनेक पक्ष गंभीरतेने घेत नसून जाहीरनाम्यातील घोषणांची अंमलबजावणी किती झाली हे देखील पक्ष लोकांना सांगत नसल्याचं वरिष्ठ राजकीय विश्लेषक हेमंत देसाई सांगतात. महाराष्ट्रातील ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या महाविकास आघाडीकडून आतापर्यंत जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला नाही, याला कारण देखील आहे. ज्याप्रमाणे देशात भाजपा आणि काँग्रेसने आपल्या पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे त्याचप्रमाणे देशात स्वतंत्रपणे एनडीए आणि इंडिया आघाडीचा एकत्रित जाहीरनामा आला नाही. महाविकास आघाडीचा जाहीरनामा विधानसभेच्या निवडणुकीच्या काळात येणे आवश्यक आहे. प्रादेशिक स्तरावर काम करणाऱ्या पक्षांना जाहीरनामा प्रसिद्ध करण्याचं कारणही लोकसभेची निवडणूक आहे, विधानसभेची नाही. विधानसभेच्या निवडणुकीत आपण कोणती आश्वासनं देणार हे सांगणं योग्य होईल. पण जाहीरनामे मात्र प्रत्येक पक्षाने गंभीरपणे घ्यावे. त्यांच्या अंमलबजावणीवर पक्षाने काटेकोरपणे लक्ष द्यावे असं आपल्याला वाटत असल्याचं राजकीय वरिष्ठ विश्लेषक हेमंत देसाई सांगतात.
दोन तीन दिवसात जाहीरनामा होणार प्रसिद्ध - महेश तपासे :जाहीरनाम्यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ता महेश तपासे म्हणाले की, पक्षाच्या वतीने काही गोष्टींवर चर्चा सुरू आहे. या मुद्यांचा समावेश जाहीरनाम्यात करण्यात येईल आणि महाविकास आघाडीचा एकत्रित जाहिरानामा दोन-तीन दिवसात जाहीर केला जाईल.