मुंबई Worli Hit And Run Case : पुण्यानंतर आता मुंबईतील वरळीत हिट अँड रनची घटना रविवारी पहाटे घडली. ॲट्रीया मॉलजवळ एका कोळी दाम्पत्याला पहाटे एका BMW गाडीनं उडवलं. या घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला. या प्रकरणातील मृत महिलेचा पती प्रदीप नाखवा (Pradeep Nakhwa) यांनी आरोपीला कडक शिक्षा करण्याची मागणी केली.
मिहीरच्या वडिलांना अटक : वरळी पोलिसांनी कारमध्ये उपस्थित असलेले राजेंद्रसिंग बिदावत आणि आरोपी मिहीरचे वडील राजेश शहा यांना अटक केली आहे. मिहीर शाह फरार असून, त्याला शोधण्यासाठी पोलिसांची सहा पथके तयार करण्यात आली असल्याची माहिती वरळी पोलिसांनी दिली.
मिहीरने मद्यप्राशन करुन गाडी चालवली? : आरोपी मिहीर शाह याने अपघातापूर्वी मद्यप्राशन केलं असल्याची माहिती समोर आली. "अपघातावेळी मिहीर स्वतः गाडी चालवत होता, अशी माहिती मृत महिलेच्या पतीने दिली. अपघातापूर्वी तो जुहू येथील बारमध्ये मित्रांसोबत पार्टी करायला गेला होता आणि तिथे त्याने मित्रांसोबत मद्यप्राशन केलं. मद्यप्राशनाचे, बारचे बिल १८ हजार रुपये झाले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी याप्रकरणी बारमधील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहेत. मद्यप्राशन करुन झाल्यानंतर तो गोरेगाव येथे गेला आणि तिथून परत मुंबईत आला. त्यानंतर त्याने वरळीतील मॉलजवळ दुचाकीला मागून ठोकले आणि त्यामध्ये महिलेला फरफटत नेलं. त्यामुळं महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ब्रेक लावला असता तर महिलेचा जीव वाचला असता : "हा अपघात झाला तेव्हा वाहन चालवत असलेल्या व्यक्तीनं तत्काळ ब्रेक लावून गाडी थांबवली असती तर, महिलेचा जीव वाचला असता. मात्र, पळून जाण्याच्या हेतूने त्याने महिलेला फरफटत नेल्यामुळं महिलेचा मृत्यू झाला," असा आरोप मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी केला. "अपघातावेळी गाडी चालवत असलेल्या व्यक्तीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करावा, आरोपी कोणीही असला तरी त्याला सोडू नये, राजकीय लागेबांधे वापरुन त्याला वाचवले जाता कामा नये, त्याच्याविरोधात कडक कारवाई करावी," अशी मागणी देशपांडे यांनी केली. याप्रकरणी आपण पाठपुरावा करत राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं.