मुंबईEstate Agent Fraud : घर खरेदी-विक्री किंवा भाडेतत्त्व या संदर्भात इंटरनेटवरील वेबसाईटद्वारे इस्टेट एजंट असल्याची जाहिरात करून लाखोंचा गंडा घालणाऱ्या सराईत गुन्हेगारांना उत्तर विभाग सायबर पोलीस ठाण्याच्या पथकाने अटक केली आहे. याप्रकरणी कांदिवली येथे राहणाऱ्या तक्रारदार व्यक्तीने दाखल केलेल्या तक्रारीवरून भारतीय दंड संविधान कलम 120 ब, 419, 420, 465, 467, 471 सह माहिती व तंत्रज्ञान कायदा कलम 66 क आणि 66 ड अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशा रितीने केली फसवणूक :तक्रारदार यांनी घर खरेदी-विक्री आणि नंतर ती भाडेतत्त्वावर देण्याच्या गुंतवणुकीकरिता वेबसाईटवरील मिरा रोड परिसरात हेवी डिपॉझिटवर फ्लॅट या ग्लोबल्स होम बेस्ट सर्व्हिसेसची जाहिरात पाहिली. यानंतर त्याने इस्टेट एजंटच्या दिलेल्या संपर्क क्रमांकावर संपर्क साधला असता यातील आरोपी आणि त्याच्या साथीदारांनी तक्रारदार यांना इस्टेट एजंट असल्याचे भासवून मीरा रोड वसई नालासोपारा परिसरातील वेगवेगळ्या फ्लॅटचे फोटो व्हाट्सअपद्वारे पाठविले. यानंतर हेवी डिपॉझिटसाठी व्यवहाराची रक्कम विविध बँक खात्यात भरण्यास भाग पाडले. तसेच गुन्ह्यातील सायबर आरोपींनी स्वतः फ्लॅटचे मालक असल्याचा बनाव करून स्वतःच्या आणि इतरांच्या नावे असलेल्या बँक खात्यात तक्रारदार यांना 22 लाख 31 हजार रुपये भरण्यास सांगितले आणि गंडा घातला.
ही आहेत आरोपींची नावे :सायबर पोलिसांनी तांत्रिक तपासाद्वारे पुण्यातील आरोपींना नालासोपारा वसई परिसरात आपला ठावठिकाणा बदलून आपले अस्तित्व बदलत वास्तव्यास असल्याचे उघड केले. तपास पथकाने वसई आणि नालासोपारा परिसरात आरोपींचा शोध घेऊन मुख्य आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. हौशीला उर्फ शिवा शिवकुमार शुक्ला (वय 27), योगेश धुले राय करवट (वय 55) आणि विशाल राजनाथ यादव (वय 29) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.