महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

इंडिया... इंडिया...! टीम इंडियाच्या विजयी मिरवणुकीला क्रिकेटप्रेमींची अभूतपूर्व गर्दी - Team India Welcome

Team India Welcome : भारताने दक्षिण आफ्रिकेचा सात धावांनी पराभव करून टी-ट्वेंटी विश्वजेतेपद जिंकले. आज भारतीय संघाचे मुंबईत मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. तर मरीन ड्राईव्ह ते वानखेडे स्टेडियम अशी क्रिकेट संघाची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी क्रिकेटप्रेमींची अभूतपूर्व अशी गर्दी पाहायला मिळाली.

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 4, 2024, 11:00 PM IST

Team India Welcome
टीम इंडियाचे स्वागत करताना क्रिकेटप्रेमी (ETV Bharat Reporter)

मुंबईTeam India Welcome :मरीन ड्राईव्हवर रस्त्याच्या दोन्ही बाजूला लोकांची गर्दी दिसली. मुंबई, उपनगरसह नाशिक, अहमदनगर, गुजरात, झारखंड, उत्तर प्रदेश, बिहार आदी ठिकाणाहून क्रिकेटप्रेमी आपल्या विश्वविजेता खेळाडूंना पाहण्यासाठी, त्यांची एक झलक बघण्यासाठी मुंबईत आलेत. या क्रिकेटप्रेमींची बसमधून मरीन ड्राईव्ह ते वानखेडे स्टेडियमपर्यंत मिरवणूक काढण्यात आली. यावेळी क्रिकेटप्रेंमींनी जोरदार घोषणाबाजी केली.

पावसाची रिपरिप :टीम इंडियाची विजय मिरवणूक सायंकाळी पाच वाजता ट्रायडेंट हॉटेल, मरीन ड्राईव्ह इथून निघणार होती; मात्र टीम इंडिया दिल्लीवरून मुंबईत सायंकाळी सहा वाजता म्हणजे उशिरा दाखल झाली. तेथून छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, येथून मरीन ड्राईव्हला यायला टीम इंडियाला उशिरा झाला. त्यामुळे ही मिरवणूक उशिरा सुरू झाली. रात्री आठ वाजता या विजयी मिरवणूकीला सुरुवात झाली. हॉटेल ते वानखेडे स्टेडियम असे एक किलोमीटरच्या अंतरादरम्यान ही विजय मिरवणूक काढण्यात आली. जवळपास अर्धा ते पाऊणतास ही विजय मिरवणूक चालली. यावेळी खेळाडूंनी ट्रॉफी उंचावत क्रिक्रेटप्रेमींना अभिवादन केले. यावेळी या मिरवणुकीआधी पावसाची रिपरिप सुरू होती. पावसाची ये-जा होती; परंतु मिरवणुकीवेळी पावसाने विश्रांती घेतल्यामुळं विजयी मिरवणूक कोणताही अडथळा आला नाही.

इंडिया... इंडियाच्या घोषणा :विश्वविजेते खेळाडू मुंबईत दाखल होणार म्हटल्यावर त्यांना पाहण्यासाठी देशभरातून क्रिकेटप्रेमी मुंबईत आज दाखल झाले होते. त्यामुळे मरीन ड्राईव्हवर आणि आजूबाजूचा परिसर या ठिकाणी पोलिसांनी कडक बंदोबस्त तैनात केला होता. तसेच वाहतुकीत हे मोठे बदल करण्यात आले होते. मरीन ड्राईव्हच्या बाजूलाच विधान भवनात सध्या पावसाळी अधिवेशन सुरू असल्यानं तिथे मोठ्या प्रमाणात पोलीस सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. तर भारतीय क्रिकेट संघाच्या विजयी मिरवणुकीला मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. कोणतीही अनुचित प्रकार घडू नये किंवा विपरीत घटना घडू नये, यासाठी मोठी सुरक्षा तैनात करण्यात आली होती. तर दुसरीकडे क्रिकेटप्रेमींनी दुपारपासूनच या ठिकाणी मोठी गर्दी केली होती. आपले लाडके क्रिकेटपटू दिसताच क्रिकेटप्रेमींनी मोठमोठ्या घोषणा देण्यास सुरुवात केली. इंडिया... इंडिया..., चक दे इंडिया..., वंदे मातरम..., तसेच विराट कोहली, रोहित शर्मा, बूम बूम बुमराह, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या यांच्या नावानेही क्रिकेटप्रेमींनी मोठी घोषणाबाजी केली. यावेळी परिसर अक्षरशः दणाणून गेला. यावेळी अभूतपूर्व असा जनसागर मुंबईत पाहायला मिळाला.

हेही वाचा :

  1. टीम इंडियाचा रोड शो, देशाच्या कानाकोपऱ्यातील क्रिकेट प्रेमींची मुंबईच्या मरीन ड्राईव्हवर प्रचंड गर्दी, टीम इंडियाला १२५ कोटींचा चेक प्रदान - Team India Road Show
  2. टीम इंडियानं पंतप्रधान नरेंद्र मोदींची घेतली भेट, रोहित आणि द्रविडनं दिली ट्रॉफी - indian Cricket team welcome
  3. टीम इंडियाच्या स्वागताला गुजरातची बस का? हा महाराष्ट्राचा अपमान... , मिरवणूक बसवरून विरोधकांची टीका - Nana Patole On Cricketer Bus

ABOUT THE AUTHOR

...view details