मुंबई Share Market Fraud Case : मध्यप्रदेशातील उज्जैन, इंदूर इथं चालू असलेले कॉल सेंटर उद्ध्वस्त करण्यात माटुंगा पोलिसांना यश आलं. माटुंगा पोलिसांनी कॉल सेंटर चालवणाऱ्या मुख्य आरोपीला अटक करून विविध राज्यातील सायबर गुन्हे उघडकीस आणले आहेत. या कारवाईमुळे माटुंगा पोलीस ठाण्यात गेल्यावर्षी आणि यावर्षी दाखल असलेल्या दोन सायबर गुन्ह्यांसह जवळपास 39 गुन्हे उघडकीस आले, अशी माहिती माटुंगा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक चव्हाण यांनी दिली. अंकित उर्फ राजकुमार श्रीराम शिंदे आणि संजय भगवानदास बैरागी अशी मध्यप्रदेशातून अटक केलेल्या या दोन आरोपींची नावं आहेत.
माटुंग्यातील व्यक्तीला लावला 8 लाखाचा चुना :माटुंगा पोलीस ठाण्यातील परिसरात राहणाऱ्या चंद्रशेखर आनंदराव तायरे यांना फेब्रुवारी 2024 मध्ये एका अज्ञात भामट्यानं कॉल करुन शेअर मार्केटबाबत माहिती दिली. यावेळी या भामट्यानं बंगळुरू इथल्या एका कंपनीबाबत एक बनावट लिंक पाठवून Profit Bull नावाचं अॅप्लिकेशन डाउनलोड करण्यास सांगितलं. यावेळी त्या भामट्यानं तायरे यांना चांगले रिटर्न मिळतील, असं सांगून त्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी 87 हजार 500 रुपये भरण्यास सांगितलं. त्यांना इलेक्ट्रॉनिक उपकरणावर चांगल्या रिटर्नचं आमिष दाखवलं. त्यानंतर सदर अॅपमध्ये 8 लाख 33 हजार रुपये भरण्यास भाग पाडल्याचा तक्रारदार तायरे यांनी केला.
पैसे विड्रॉल करण्याचा प्रयत्न केलावर कळलं लागला चुना :पैसे भरल्यानंतर तायरे यांनी ते विड्रॉल करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना पैसे विड्रॉल करता आले नाहीत. त्यावेळी त्यांनी आरोपीला संपर्क साधला असता तो पुन्हा वेगवेगळ्या कारणांसाठी पैसे पाठवण्याबाबत सांगू लागला. त्यामुळे तक्रारदार यांना संशय आल्यानं त्यांनी माटुंगा पोलीस ठाण्यास तक्रार अर्ज दिला. त्यानुसार माटुंगा पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम 409, 420, 467, 468, 471 सह माहिती आणि तंत्रज्ञान अधिनियम कलम 66 क, 66 ड अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.