कोल्हापूर : राज्यात बहुमतानं महायुतीचं सरकार सत्तेत आलं. मात्र, सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'मुळं अनेक विकास कामांना कात्री लागण्याची वेळ आली आहे. ठेकेदारांची बिलं न मिळाल्यास 1 मार्चपासून काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनं घेतला आहे.
१ मार्चपासून काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय : राज्यात बहुमतानं महायुतीचं सरकार सत्तेत आलं. मात्र, सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेमुळं अनेक विकास कामांना कात्री लावण्याची वेळ आली आहे. तसंच 5 महिने शासकीय विकासकामे केलेल्या कंत्राटदारांचा 650 कोटींचा निधी राज्य सरकारकडं थकला आहे. यामुळं नवीन कामंही रेंगाळली आहेत. महाराष्ट्र राज्य कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे राज्य अधिवेशन यवतमाळ इथं पार पडलं, या अधिवेशनात ठेकेदारांची बिलं न मिळाल्यास 1 मार्चपासून काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
अधिवेशन काळात काम बंद आंदोलन करण्याचा इशारा : कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे 110 शासकीय कामाच्या ठेकेदारांची बिलं गेली 5 महिने मिळालेली नाहीत. मुख्यता सार्वजनिक बांधकाम विभागाकडं असलेल्या विकासकामांची पूर्तता होऊनही बिलं देण्यात महायुती सरकार अपयशी ठरलं आहे. यामुळं व्यथित झालेल्या जिल्ह्यातील कंत्राटदारांनी जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडं निवेदनाद्वारे मागणी केली होती. महाराष्ट्र राज्य कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे राज्य अधिवेशन काल (दि.१०) यवतमाळ इथं पार पडलं. या अधिवेशनात बिल थकल्यामुळं हे आंदोलन टप्प्याटप्प्यानं करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, मुख्य अभियंता आणि अधीक्षक अभियंता यांना याबाबतची निवेदनं देण्यात येणार आहेत. कंत्राटदारांच्या थकलेल्या बिलासंदर्भात निर्णय न झाल्यास 1 मार्चपासून सुरू होणाऱ्या राज्य विधिमंडळाच्या मुंबईतील अधिवेशन काळात काम बंद आंदोलन करण्याचा इशारा कोल्हापूर जिल्हा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे अध्यक्ष रमेश भोजकर यांनी दिला.