महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राहुल, प्रियंका अन् खरगे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार नाहीत, संजय राऊतांचा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला उपरोधिक टोला

राज्याचे मुख्यमंत्री लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी, प्रियंका गांधी किंवा मल्लिकार्जुन खरगे बनणार नाहीत हे आम्हाला माहीत आहे. मुख्यमंत्रीपदाबाबतची चर्चा दिल्लीत होणार असल्याचे त्यांनी म्हटलंय.

By ETV Bharat Marathi Team

Published : 7 hours ago

Sanjay Raut
संजय राऊत (ETV Bharat File Photo)

मुंबई- हरियाणा आणि जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होण्यास सुरुवात झालीय. हरियाणातील आतापर्यंत हाती आलेल्या निवडणुकीच्या निकालात काँग्रेस आणि भाजपा यांच्यात काट्याची टक्कर सुरू आहे. हरियाणा राज्यात गेल्या 10 वर्षांपासून भाजपाची सत्ता असून, सत्ता राखण्यात भाजपाला यश येतं का? याकडे सर्वांचे लक्ष लागलंय. तर हरियाणा आणि जम्मू-काश्मिरात काँग्रेस सरकार स्थापन करेल, असा विश्वास ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलाय. त्यासोबतच त्यांनी भाजपावर टीकास्त्र डागलंय.


भाजपाला पुन्हा निवडून देणार नाही: हरियाणा आणि जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकांचा कल हळूहळू समोर येतोय. त्याविषयी प्रतिक्रिया देताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले की, मतमोजणीच्या शेवटच्या फेरीपर्यंत निवडणुकीचे कल हे मागेपुढे होत असतात. हरियाणा राज्यात आधी भाजपाची सत्ता होती. मुख्यमंत्री सैनी म्हणाले होते की, जिंकण्याचा पूर्ण बंदोबस्त केल्याचं त्यांनी म्हटलं होतं. त्याकडे आम्ही बघू मात्र हरियाणा राज्यामध्ये भाजपा, पंतप्रधान मोदी, अमित शाह यांच्या विरोधात लाट आहे. त्यामुळे त्या राज्यातील जनता भाजपाला पुन्हा निवडून देणार नाही, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केलाय. पूर्ण निकाल येणे बाकी असून, मला विश्वास आहे. हरियाणामध्ये काँग्रेस सरकार स्थापन करेल आणि जम्मू-काश्मीर काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स आघाडीचे सरकार स्थापन होणार आहे. जम्मू-काश्मीर राज्यांच्या संदर्भात भाजपाकडून मोठ-मोठ्या वल्गना केल्या जात होत्या, मात्र मतदारांनी भाजपाला आपल्या राज्यातून बाहेर काढल्याचं संजय राऊत सांगतायत.



भाजपाचा मुखवटा उतरला :हरियाणा आणि जम्मू-काश्मीरच्या निवडणुकांच्या निकालानंतर महाराष्ट्राच्या राजकारणावर परिणाम होणार का? यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह आणि त्यांच्या पक्षानं कोणत्याही राज्यात निवडणुका घ्याव्यात तेथे त्यांना पराभव पत्करावा लागेल. मोदी यांचा जलवा संपुष्टात आलाय. हरियाणा आणि जम्मू-काश्मीरच्या निवडणुकांबरोबर महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक झाली असती तर येत्या निवडणुकीचे निकाल भाजपाविरोधात असते. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार येणारच आहे. महाराष्ट्र आणि झारखंड राज्यात भाजपाचा पराभव होईल, असा अंदाज संजय राऊत यांनी व्यक्त केलाय.




काँग्रेस पक्षाला टॉनिक मिळेल :महाविकास आघाडीच्या जागावाटपासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना संजय राऊत म्हणाले की, सत्ताधाऱ्यांनी तरी कुठे जागावाटप केले. राज्यात विधानसभेच्या 288 जागा आहेत. दोन-तीन दिवसांत महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा टास्क पूर्ण होणार आहे. नाना पटोले म्हटल्याप्रमाणे दसऱ्याच्या मुहूर्तावर महाविकास आघाडीची पहिली यादी जाहीर होईल, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केलाय. हरियाणा आणि जम्मू-काश्मीरमधील निवडणूक निकालानंतर काँग्रेस महाविकास आघाडीतील घटक पक्षांवर दबाव निर्माण करेल का? यावर राऊत म्हणाले की, असं काहीही होणार नाही. काँग्रेस पक्षाला टॉनिक मिळेल, लोकसभेला ज्या प्रकारे आम्ही एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे गेलो, तशाच प्रकारे विधानसभेलादेखील जाणार आहोत. विधानसभा निवडणुकीतील विजयामुळे महाविकास आघाडीला निश्चितच टॉनिक मिळणार असल्याचे संजय राऊत म्हणालेत. अशा प्रकारच्या काँग्रेस निकालामुळे मुख्यमंत्री पदावर दावा वगैरे अशा प्रकारे कोणी दावा करत नसतं. निवडणुका होतील, निकाल येतील, त्यानंतर आम्ही एकत्र बसणार आहोत. जनतेला कोण मुख्यमंत्री हवंय यावर चर्चा होईल, राज्याचे मुख्यमंत्री लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी, प्रियंका गांधी किंवा मल्लिकार्जुन खरगे बनणार नाहीत हे आम्हाला माहीत आहे, त्यामुळे राज्याचा मुख्यमंत्री महाविकास आघाडीचा कोण असेल हे आम्हाला माहिती असून, मुख्यमंत्री पदाबाबतची चर्चा दिल्लीत होणार असल्याचे त्यांनी म्हटलंय.




निवडणूक आयोग म्हणजेच भाजपा :निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर निवडणुकीचे कल मागेपुढे होत आहेत, यावर राऊत म्हणाले की, निवडणूक आयोग म्हणजेच भाजपा असून, ते काहीही करू शकतात, असा दावा संजय राऊत यांनी केलाय. संपूर्ण निकाल हाती येऊ द्या, हरियाणा काँग्रेस सरकार स्थापन होईल, यात शंका नसल्याचे राऊत म्हणालेत .काँग्रेसच्या प्रिया दत्त ह्या निवडणूक लढणार असतील, तर त्यांचं स्वागत असून, त्या निवडून येतील असा विश्वासदेखील संजय राऊत यांनी व्यक्त केलाय. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येत्या काळात शिवसेना पक्षात मोठ्या प्रमाणात इनकमिंग पाहायला मिळणार आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाचे त्यांना सोडून गेले काही आमदार स्वगृह परतण्याच्या तयारीत आहेत. तसेच शिवसेना सोडून गेलेल्या काही आमदारांना घर वापसी मिळणार का? यावर संजय राऊत म्हणाले की, जो प्रश्न तुम्ही विचारताय, त्याचे उत्तर तुम्हाला कृतीतून पाहायला मिळणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

हेही वाचा

  1. 'लाडकी बहीण योजने'वरुन संजय राऊत यांचा सरकारवर हल्लाबोल; म्हणाले... - Sanjay Raut On Ladki Bahin Yojana
  2. कोल्हापुरामध्ये महायुतीत धुसफूस वाढली, उत्तरनंतर दक्षिणेत शिवसेनेनं थोपटले 'दंड' - Kolhapur Assembly Election

ABOUT THE AUTHOR

...view details