महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मराठवाड्यात विकासाची गंगा आणणार, काश्मीरमध्ये वेगळं संविधान आणण्याचा काँग्रेसचा प्रयत्न - पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान मोदी यांनी छत्रपती संभाजीनगरच्या भाषणात पाडला मराठवाड्याच्या विकासाच्या घोषणांचा पाऊस

नरेंद्र मोदी
नरेंद्र मोदी (ईटीव्ही भारत बातमीदार)

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 14, 2024, 6:08 PM IST

Updated : Nov 14, 2024, 7:00 PM IST

छत्रपती संभाजीनगर - काँग्रेसचं स्वप्न काश्मीरमधून बाबासाहेबांचं संविधान हटवणं हा आहे. हे स्वप्न पाकिस्तानची भाषा बोलणारे काँग्रेस आणि मित्र पक्ष आहेत, अशा लोकांना धडा शिकवणार का नाही. त्यामुळे निर्णायक सरकारची गरज आहे. खुर्चीसाठी लढणारे आघाडीचे लोक महाराष्ट्रासाठी काम करू शकणार नाहीत अशी घणाघाती टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर सभेतून केली. काँग्रेस आणि इतर मित्र पक्षांनी काश्मीरमध्ये पुन्हा कलम ३७० लागू करण्याचा प्रस्ताव आणला आहे. कश्मीर भागाला ३७० कलम पासून मुक्तता दिली, त्याचा त्यांनी विरोध केला, त्यासाठी दिवसरात्र एक केला. आता पुन्हा तो लागू करून काश्मीरचं वेगळं संविधान करण्याचा प्रयत्न आहे. मात्र काश्मीर आमचाच आहे असा इशारा नरेंद्र मोदी यांनी महाविकास आघाडीला दिला.


संभाजीनगरात मोदींचे अनोखे स्वागत - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं जंगी स्वागत छत्रपती संभाजीनगरच्या सभेत करण्यात आलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपा नेते रावसाहेब दानवे, खा. डॉ. भागवत कराड यांनी जिल्ह्याची खास ओळख असलेल्या पैठणीपासून तयार केलेला फेटा बांधूनत्यांचं स्वागत केलं. तर छत्रपती संभाजी महाराजांची मूर्ती त्यांना भेट म्हणून देण्यात आली. भाषणाच्या सुरुवातीलाच छत्रपती संभाजी महाराजांना मानणाऱ्या संभाजीनगरच्या लोकांना माझा नमस्कार असं म्हणत मराठीमध्ये सुरुवात केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचं सभेतील भाषण (ETV Bharat Reporter)



शेतकऱ्यांसाठी योजना आणणार - महायुती म्हणजे महाराष्ट्राची प्रगती. आमचं सरकार कापसाला भाव देण्याचा प्रयत्न करत आहे. किसान सन्मान योजना अंतर्गत मोठी मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली आहे. संभाजीनगरमध्ये चार लाखांहून अधिक लोकांना फायदा झाला. आमचं सरकार सोयाबीन शेतकऱ्यांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी वेगळे पाच हजार रुपये देत आहे. दर वाढवून देण्याचा निर्णय घेत आहोत. पुढील पाच वर्षांत शेतकऱ्यांना नवीन दर, नव्या योजना मिळतील. विजेची चिंता नसावी यासाठी प्रत्येकाच्या शेतात सोलर ऊर्जा पोहचवण्याचा प्रयत्न करत आहोत. किसान क्रेडिट कार्डचा फायदा करून देत आहोत, असं यावेळी सांगण्यात आलं.

काँग्रेस जातीत देश वाटू पाहतोय - काँग्रेस जाती जातीत देश वाटण्याचा प्रयत्न करत आहेत. सत्तेत येण्यासाठी आरक्षणाच्या विरोधात काँग्रेस आहे. इंटरनेटवर जुन्या बातम्या दिसत आहेत. आरक्षणाला घेऊन काँग्रेसचा खरा चेहरा दिसतोय त्याची चर्चा होत आहे. विदेशात जाऊन आरक्षण काढण्याची भाषा करतात असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केली. छोट्या छोट्या समाजात वाटणी केली जात आहे. जातीजातीत भांडणं लावण्याचं काम करत आहेत. ओबीसी जातीजातीत वाटले जातील तर त्यांची ताकद कमी होईल आणि काँग्रेसला फायदा होईल. त्यातून सत्ता मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. काँग्रेस सत्तेत आली तर एस.टी, एस.सी. ओबीसी मधील आरक्षण अडवलं जाईल. त्यामुळे जागरूक राहा, एकतेची ताकद वाढेल असं म्हणत पुन्हा एकदा "हम एक है तो सेफ है" असा पुनरुच्चार नरेंद्र मोदी यांनी केला.

छत्रपती संभाजीनगरच्या कार्यक्रमात नरेंद्र मोदी आणि इतर (ईटीव्ही भारत बातमीदार)

बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण केले - काँग्रेसचा दबाव असल्यानं शहराचं नाव बदलता आलं नाही. आम्ही बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा पूर्ण केली. औरंगाबादला नवीन नाव दिलं. या निर्णयाच्या विरोधात लोक न्यायालयात गेले. मराठी स्वाभिमानाच्या विरोधात उभे राहिले. आमची ओळख आहे त्या विरोधात आहेत. महाराष्ट्र अशा लोकांना कधी स्वीकारणार का? महाराष्ट्राला प्रतिनिधित्व करायचं आहे. भाजपा आणि महायुती नवीन संकल्प घेऊन पुढे जात आहे. नवीन गोष्टी घडवत आहेत, विदेशी गुंतवणूक महाराष्ट्रात झाली आहे. मोठ्या कंपन्या आता राज्यात काम करतील. संभाजीनगर आणि राज्यातील लोकांना जास्तीत जास्त रोजगार देण्याचा प्रयत्न आहे. मराठीला अभिजात दर्जा देण्याचं काम देखील भाजपानं केलं. आघाडीच्या लोकांनी अडचणी वाढवण्याचं काम केलं.

मराठवाड्याचा पाणी प्रश्न मिटवणार - मराठवाड्यात कायम पाण्याचं संकट राहिलं. मात्र आघाडीचे लोक हातावर हात ठेवून होते. आम्ही दुष्काळा विरोधात ठोक योजना केल्या. मराठवाड्यात पाणी आणण्याचा प्रयत्न केला. जलयुक्त शिवार योजना आणल्या. मात्र मध्येच अडीच वर्ष आघाडी सरकारने योजना बंद केली. मात्र, आमचं सरकार आल्यावर आम्ही पुन्हा योजना सुरू केली. संभाजीनगर शहराच्या पाणी योजनेला सोळाशे कोटी रुपयांची योजना दिली, ती बंद केली. आता पुन्हा केंद्र सातशे कोटी रुपये योजनेला देऊन पुन्हा काम सुरू करत आहे. हा फरक आहे आमच्यात आणि त्यांच्यात. आघाडीचे लोक पाण्याच्या थेंबाला देखील त्रास देतील. म्हणून यांना मतं देऊ नका. देशभक्ती सर्वात वर आहे. त्यामुळे महायुती उमेदवारांना मतदान करा. महाराष्ट्र नवीन उंची गाठेल, असं म्हणत आपल्या सर्वांचं प्रेम पाहून आपला आभारी आहे असे आभार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभेला आलेल्या लोकांचे मानले.

हेही वाचा...

  1. पंतप्रधान नरेंद्र मोदी शरद पवारांवर टीका करत नाहीत, नेमकं काय असेल कारण?
  2. पंतप्रधान मोदींचं महाविकास आघाडीला थेट आव्हान; म्हणाले, "राहुल गांधी यांच्या तोंडून..."
Last Updated : Nov 14, 2024, 7:00 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details