नागपूरCongress On Draught Situation :मे महिना चांगलाच तापलेला आहे. मान्सून सुरू होण्यास काही अवधी शिल्लक आहे; मात्र, राज्याच्या प्रत्येक भागालाचं दुष्काळाच्या प्रचंड झळा बसू लागल्या आहेत. अनेक भागात तर पिण्याचे पाणीसुद्धा उपलब्ध नाही. त्यामुळे राज्यभर अतिशय विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्य सरकारकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजना अपुऱ्या आहेत. त्यामुळे आता काँग्रेस नेते विभागीय स्तरावर दुष्काळी पाहणी दौरे करणार आहेत.
कॉंग्रेसकडून दुष्काळ पाहणी समिती :राज्यभरात आता निर्माण झालेली दुष्काळाची भीषणता पाहता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राज्यातील वेगवेगळ्या भागात जाऊन दुष्काळाची पाहणी करून सरकार कडून काय उपाययोजना केल्या जात आहेत, यावर नजर ठेवणार आहे. त्यासाठी काँग्रेसने विभागनिहाय दुष्काळ पाहणी समिती स्थापन केली आहे.
यांच्या नेतृत्वाखाली समिती काम करेल :काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले मराठवाड्याच्या दुष्काळ पाहणी समितीचे अध्यक्ष राहणार आहेत. विदर्भातील नागपूर विभागासाठी विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवारांकडे दुष्काळ पाहणी समितीची जबाबदारी असेल. अमरावती विभागासाठी आमदार यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वातील समिती पाहणी करेल तर उत्तर महाराष्ट्रासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात दुष्काळ पाहणी समितीची अध्यक्षता करतील. पश्चिम महाराष्ट्रासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वात दुष्काळ पाहणी समिती काम करेल. याशिवाय कोकण विभागासाठी नसीम खान यांच्या नेतृत्वात दुष्काळ पाहणी समिती स्थापन करण्यात आली आहे.