नंदुरबार Lok Sabha Election 2024 : "मणिपूरमध्ये झालेल्या घटनेच्या बाबतीत पंतप्रधान नरेंद्र मोदींसह त्यांचा एकही मंत्री संसदेत बोलू शकला नाही. मणिपुरातील घटना रोखण्यासाठी गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुठलंही पाऊल उचललं नाही, म्हणून मोठी घटना घडली," असा हल्लाबोल प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केला. "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल सभेत बोलताना 'मी शबरी मातेचा पुजारी आहे,' असं सांगितलं. मग मणिपूरमधील 'शबरी'चा अपमान झाला तेव्हा, पंतप्रधान मोदी चूप का होते," असा रोखठोक सवाल प्रियंका गांधी यांनी केला.
आदिवासी मंत्री हेमंत सोरेन यांना टाकलं कारागृहात :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर प्रियंका गांधी यांनी नंदुरबार इथं सडकून टीका केली. "देशात एकमेव आदिवासी मुख्यमंत्री असलेल्या हेमंत सोरेन यांना देखील मोदी सरकारनं कारागृहात टाकलं आहे. हा एक प्रकारे आदिवासींवर अन्यायच आहे. आदिवासी नागरिकांसाठी जीवन समर्पित करणाऱ्या देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते नवीन संसदेचं उद्घाटन न केल्यानं त्यांचा अपमानच केला आहे. एकीकडं पंतप्रधान म्हणतात आदिवासींचा सन्मान करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, तर दुसरीकडं आदिवासींचा अपमान अशा प्रकारे केला जात आहे. जो खरंच सन्मान करतो, तो राजकीय फायद्यासाठी सन्मान करत नाही. नरेंद्र मोदी फक्त राजकीय फायद्यांसाठी सन्मान करत आहेत. महाराष्ट्रात सुमारे दोन लाख आदिवासींना वनपट्टे दिले गेले नाहीत, हा काय आदिवासींचा सन्मान आहे."