मुंबई -महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची घोषणा कधीही होऊ शकते. मात्र हरियाणात झालेल्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा झालेला पराभव इंडिया आघाडीसाठी डोकेदुखी ठरू शकतो. कमजोर ठिकाणी निवडणूक जिंकण्यासाठी भाजपा स्थानिक आणि प्रादेशिक पक्षांची मदत घेत असतो. तशाच प्रकारचं धोरण काँग्रेस पक्ष राबवित असल्याचा घणाघात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी काँग्रेसवर केलाय. संजय राऊतांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधलाय, त्यावेळी ते बोलत होते.
काँग्रेस भाजपाचंच धोरण राबवतं: देशातील हरियाणा आणि जम्मू-काश्मीर या दोन राज्यांत विधानसभेच्या निवडणुका पार पडल्यात. जम्मू-काश्मीरमध्ये 370 कलम हटवल्यानंतर मोठी क्रांती होईल, असं भाजपाला वाटत होतं. 370 कलम हटवणे हा भाजपाचा प्रचाराचा एक भाग होता. 370 हटवूनदेखील जम्मू-काश्मीरमध्ये भाजपाचा पराभव झालाय. एक राज्य इंडिया आघाडीकडे आणि एक राज्य भाजपाकडे म्हणजेच 90 - 90 असा फॉर्म्युला म्हणता येईल. जम्मू-काश्मीरमध्ये इंडिया आघाडीचा विजय झालाय. मात्र हरियाणामध्ये इंडिया आघाडी झाली असती तर त्यात सपा, आप, ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला एखादी जागा मिळाली असती, त्याचा फायदा इंडिया आघाडीला निश्चित झाला असता. काँग्रेसला विश्वास वाटत होता की, आम्ही एकतर्फी जिंकू. काँग्रेस पक्ष ज्या ठिकाणी कमजोर असतो, त्या ठिकाणी ते स्थानिक, प्रादेशिक पक्षांची मदत घेतात हे भाजपाचं धोरण असतं. ज्या ठिकाणी काँग्रेस मजबूत असतो, त्या ठिकाणी ते स्थानिक आणि प्रादेशिक पक्षांना महत्त्व देत नसल्याचं संजय राऊत यांनी म्हटलंय. याचा परिणाम हरियाणाच्या निकालावर झालाय. हरियाणातील विधानसभेत भाजपाचा विजय होईल, असा दावा करणारा कोणीही भेटला नव्हता, असं संजय राऊत यांनी म्हटलंय.
कुणी स्वतःला मोठा भाऊ समजू नये:ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले की, हरियाणा राज्यातील पराभव हा दुर्दैवी असून, त्यातून आम्हाला बरेच काही शिकता येईल. देशातल्या निवडणुका आम्हाला इंडिया आघाडी म्हणजेच एकत्रच लढाव्या लागणार आहेत. कोणीही स्वतःला मोठा भाऊ, छोटा भाऊ समजू नये, लोकसभा निवडणुकीत मिळालेले यश हे इंडिया आघाडीमुळेच असल्याचं म्हणत संजय राऊत यांनी पुन्हा एकदा काँग्रेसवर निशाणा साधलाय. हरियाणातील निकालाचा कुठलाही परिणाम महाराष्ट्राच्या निवडणुकीवर होणार नसल्याचा दावादेखील संजय राऊत यांनी केलाय. महाराष्ट्रात शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या सारखं नेतृत्व हे जागृत नेतृत्व असल्याचं त्यांनी म्हटलंय.
स्वबळाविषयी भूमिका काँग्रेसने जाहीर करावी :हरियाणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला नऊ जागा कमी पडल्यात, 25 जागा कमी पडलेल्या नाहीत. परंतु काँग्रेस पक्षाला आतापासूनच अनेक राज्यातील निवडणुकांसंदर्भात भूमिका घ्यावी लागेल, देशभरात काँग्रेसला जर स्वबळावर लढायचं असेल, तर तशी भूमिका त्यांनी जाहीर करावी, त्यानंतर इतर पक्ष त्या त्या राज्यात निर्णय घेतील, असं म्हणत संजय राऊतांनी काँग्रेस पक्षाला इशारा दिलाय.
अपक्षांना उभं करून मतांचं धुव्रीकरण: हरियाणातील विजयाची पुनरावृत्ती महाराष्ट्रात होणार असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. त्याचाही संजय राऊतांनी समाचार घेतलाय. संजय राऊत म्हणाले की, हे शक्यच नाही, हरियाणातील विजय हा महान, देदीप्यमान विजय नसून ठिकठिकाणी अपक्षांना उभे करून त्यांनी मतांचं धुव्रीकरण केल्याचा आरोप संजय राऊत यांनी भाजपवर केलाय. आमच्या मतात विभाजन झाल्यानेच त्याचा फायदा भाजपाला झालाय. जो जिंकतो तो सिकंदर, तुम्ही जिंकलात तुमचं अभिनंदन, देशात लोकशाही असल्याचंदेखील संजय राऊत यांनी म्हटलंय.