चंद्रपूर Chandrapur Assembly Election 2024 : मागील 29 वर्षांच्या इतिहासात काँग्रेसला चंद्रपूर मतदारसंघात विजय मिळवता आलेला नाहीय. मात्र, 2024 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा ऐतिहासिक विजय झाल्यानं काँग्रेसच्या कार्यकर्त्यांत एक नवी 'उमेद' निर्माण झाली आहे. यापूर्वी चंद्रपूर विधानसभेसाठी निवडणूक लढणारे उमेदवार काँग्रेसला मिळत नव्हते. आता, मात्र येथून लढण्यासाठी इच्छुक उमेदवारांची झुंबड उडाली आहे. जवळपास आठ ते दहा जण गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असून ही उमेदवारी मिळवण्यासाठी चढाओढ करताना उमेदवार दिसत आहे. त्यामुळं या निवडणुकीत काँग्रेसचा 29 वर्षांचा वनवास संपेल का?, हे बघणे उत्सुक्याचं ठरणार आहे.
सलग 28 वर्षे काँग्रेसचं वर्चस्व : 1960 मध्ये महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यापासून चंद्रपूर विधानसभेवर काँग्रेसचा दबदबा होता. 1962 च्या विधानसभा निवडणुकीत रामचंद्र पोटदुखे हे अपक्ष म्हणून निवडून आले होते. यानंतर तब्बल 28 वर्षे या जागेवरून काँग्रेसनं एकहाती विजय मिळावलाय. 1995 पर्यंत या जागेवर निर्विवादपणं काँग्रेसचं वर्चस्व होतं. 1967 तसंच 1972 ला काँग्रेसचे एकनाथ साळवे हे सलग दोनदा निवडून आले होते. यानंतर 1978 तसंच 1980 मध्ये काँग्रेसचे नरेश पुगलिया आमदार होते. यानंतर 1985 आणि 1990 मध्ये काँग्रेसकडूनच श्यामबाबू वानखेडे आमदार झाले.
काँग्रेसच्या परंपरेला मुनगंटीवारांनी लावला सुरुंग : 1995 पर्यंत या जागेवर काँग्रेसची निर्विवाद सत्ता होती. मात्र, या राजकीय परंपरेला छेद दिला तो भाजपाचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी. 1995 मध्ये त्यांनी काँग्रेसचे शाम वानखेडे यांना पराभूत केलं. 1999 आणि 2004 अशी सलग तीन वेळा विजयाची हॅट्रिक मारली. यानंतर ही जागा अनुसूचित जातीसाठी राखीव झाली. त्यानंतर मुनगंटीवारांना ही जागा सोडावी लागली. यानंतर 2009 आणि 2014 मध्ये भाजपाचे नाना शामकुळे निवडून आले. 2019 मध्ये अपक्ष म्हणून किशोर जोरगेवार निवडून आले.
कोण कोण आहेत रांगेत? : या लोकसभेत सर्वत्र काँग्रेसची लाट असल्याचं दिसून आलं. मातब्बर राजकारणी समजले जाणारे सुधीर मुनगंटीवार यांचा काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांनी तब्बल 2 लाख 60 हजार मतांनी पराभव केला. चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात मुनगंटीवार यांना 80 हजार 484 मतंच मिळाली, तर प्रतिभा धानोरकर यांना तब्बल 1 लाख 19 हजार 811 मतं मिळाली. जवळपास 40 हजारांचा हा फरक आहे. या विजयामुळं काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांमध्ये नवचैतन्य संचारलं आहे. त्यामुळं आपल्याला उमेदवारी मिळावी, यासाठी काँग्रेसचे पदाधिकारी चढाओढ करताना दिसत आहे. ही जागा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. सलग दोन वेळा डिपॉझिट जप्त होऊन महेश मेंढे ते तिसऱ्यांना काँग्रेस पक्षाकडून लढण्यास इच्छुक आहेत. एरव्ही दिसेनासे झालेले मेंढे हे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अचानक सक्रिय व्हायला लागलेय. सध्या त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाचा विजय झाला म्हणून चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्याचा सपाटा सुरू केला आहे.
उमेदवारीची माळ नेमकी कुणाच्या गळ्यात : दुसरीकडं प्रसिद्ध रिडीओलॉजिस्ट डॉ. दिलीप कांबळे यांनी देखील तयारी सुरू केली आहे. यासाठी त्यांनी विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवारांना घेऊन दिल्लीवारी देखील केली. आंबेडकरी चळवळीतील ते सक्रिय कार्यकर्ते आहेत. माजी नगरसेवक प्रवीण पडवेकर हे देखील आता अचानक सक्रीय झाले आहेत. तर पोलीस खात्यातुन निवृत्त झालेले सुधाकर अंभोरे यांनी नुकताच प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला असून 'सेकंड इनिंग' खेळण्यास ते देखील इच्छुक आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षात प्रवेश घेणारे राजू झोडे यांच्या नावाची देखील चर्चा आहे. महिला काँग्रेसच्या अश्विनी खोब्रागडे यांनी देखील आपल्याला उमेदवारी देण्यात यावी, असं पत्र जिल्हाध्यक्षांना दिलं आहे. तर रिपब्लिकन चळवळीचे नेते आणि डॉ. राजाभाऊ खोब्रागडे यांचे नातू प्रवीण खोब्रागडे यांनी देखील स्वतंत्रपणे तयारी सुरू केली आहे. त्यांना काँग्रेस पक्ष समर्थन देण्याची देखील शक्यता वर्तविण्यात येत आहे. उमेदवार कोणीही असो, मात्र खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या संमतीनंच उमेदवारी देण्याची शक्यता आहे. त्यामुळं उमेदवारीची माळ नेमकी कुणाच्या गळ्यात पडते याबाबत उत्सुकता कायम आहे.
'हे' वाचलंत का :
- शिवसेनेची विधानसभेसाठी रणनीती ठरली; बैठकीत काय झाले? - CM Eknath Shinde
- विधानसभा निवडणुकीपूर्वी ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा दिलासा; निवडणूक आयोगानं घेतला मोठा निर्णय - Shivsena UBT
- 1500 रुपयात मुख्यमंत्र्यांचं घर चालंल का? लाडका भाऊ योजनेवरुन विरोधकांचा हल्लाबोल - Ladka Bhau Yojana