पिंपरी चिंचवड Condoms in Samosa : पिंपरी चिंचवड शहरातील चिखली पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या एका मोठ्या नामांकित कंपनीमध्ये कामगार खात असलेल्या समोशामध्ये कंडोम, गुटखा, आणि दगड अशा गोष्टी आढळून आल्या आहेत. या प्रकरणात चिखली पोलीस स्टेशनमध्ये (Condom found in Samosa) तक्रारदारानं पूर्वी समोसे पुरवणाऱ्या कंत्राटदार 'एसआरएस इंटरप्राईजेस'चे मालक रहीम शेख, अजहर शेख, मझर शेख, कामगार फिरोज शेख उर्फ मंटू आणि विकी शेख या आरोपींविरोधात गुन्हा दाखल केलाय.
काय आहे प्रकरण? : कंपनीमध्ये आपला समोसा पुरवठा करण्याचा करार रद्द झाल्यानं, संतापलेल्या कंत्राटदारानं नव्यानं समोसा पुरवठा करणाऱ्या कंपनीची प्रतिमा खराब करण्यासाठी आपल्या कामगारांच्या मदतीनं कट रचून समोशात कंडोम, गुटखा आणि दगड मिसळून कंपनीला समोसे पुरवले, अशी माहिती समोर आलीय. तशी अधिकृत माहिती देखील चिखली पोलिसांनी दिलीय. त्यामुळं बदला घेण्यासाठी हे कृत्य केल्याचं समोर आलंय.
पोलिसांनी केला गुन्हा दाखल : पिंपरी चिंचवडमध्ये हा प्रकार घडलाय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑटोमोबाईल फर्मच्या कँटीनमध्ये खाद्यपदार्थांचा पुरवठा करण्यात येतो. या फर्मनं दुसऱ्या एका कंत्राटदाराला कँटीनला समोसा पुरवण्याचं कंत्राट दिलं होतं. शनिवारी ऑटो फर्मच्या काही कर्मचाऱ्यांनी खाद्यपदार्थांविषयी तक्रार केली. समोशामध्ये कंडोम, गुटखा आणि दगड मिळाल्याची तक्रार कर्मचाऱ्यांनी केली. तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय.
27 मार्च 2024 रोजी हा प्रकार घडला. समोशामध्ये कंडोम, पान, गुटखा, दगड अशा वस्तू आढळून आल्या आहेत. चिखली पोलीस ठाण्यात कलम 328, 120 ब नुसार गुन्हा दाखल केलाय. कंत्राट रद्द केल्यानं जुन्या कंपनीच्या सांगण्यावरुन आरोपीनं हे कृत्य केल्याचं समोर आलंय. पुढील तपास सुरू आहे - ज्ञानेश्वर काटकर, पोलीस निरीक्षक, चिखली पोलीस ठाणे
कंत्राट रद्द केल्याचा राग : चिखली पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी प्रकरणात दोघांवर संशय व्यक्त केला. त्यांनीच समोशात कंडोम, गुटखा आणि दगड भरल्याचं समोर आलंय. 27 मार्च रोजी हा प्रकार घडला होता. कँटीनमध्ये कर्मचारी समोसा खात असताना त्यामध्ये कंडोम, गुटखा, पान मसाला, दगड आढळले होते. कंत्राट रद्द केल्याच्या रागातून हा प्रकार केल्याचं प्राथमिक तपासात समोर आलंय. समोशामध्ये काही तरी मिसळून ठेकेदाराला बदनाम करण्याचा आरोपींचा प्रयत्न होता. पोलिसांनी प्रकरणात पाच आरोपींना अटक केलीय. प्रकरणाचा पोलीस पुढील तपास करत आहेत.