मुंबई Budget Reaction : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोदी सरकारचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. मध्यमवर्गीयांसाठी मोदी सरकारनं अर्थसंकल्पात मोठी घोषणा केली आहे. घर घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्या मध्यमवर्गीयांसाठी सरकार गृहनिर्माण योजना सुरू करणार आहे. (Budget 2024) अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गुरुवारी लोकसभेत ही घोषणा केली. अंतरिम अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री म्हणाल्या की, पात्र मध्यमवर्गीयांना स्वतःचं घर विकत घेता यावं किंवा बांधता यावं यासाठी सरकार गृहनिर्माण योजना सुरू करणार आहे. सरकार भाड्याची घरे किंवा झोपडपट्टी किंवा चाळी आणि अनधिकृत वसाहतींमध्ये राहणाऱ्या पात्र मध्यमवर्गीय लोकांना स्वतःचं घर विकत घेण्यासाठी किंवा बांधण्यासाठी मदत करणार आहे.
अर्थसंकल्पात सामान्य माणसाचा विचार :या अर्थसंकल्पावर सर्वसामान्य मुंबईकरांना काय वाटतं हे जाणून घेण्यासाठी त्यांच्या प्रतिक्रिया घेतल्या असता ते म्हणाले की, ''सरकारने या अर्थसंकल्पात सामान्य माणसाचा विचार केला आहे. त्याबाबत आम्ही त्यांचे आभार मानतो. एकतर महागाई खूप आहे आणि त्यात जो आपल्या तुटपुंज्या पगारातून टॅक्स भरावा लागतो तो परवडत नाही. त्यामुळे सरकारनं जो सात लाखांपेक्षा वार्षिक उत्पन्न कमी असलेल्यांना कोणताही टॅक्स लागणार नाही असा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो आणि सरकारचे आभार मानतो.''
महिलांसाठी ही महत्त्वपूर्ण घोषणा :या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी प्रधानमंत्री आवास योजनेत ७० टक्के महिलांना घरं दिली जातील अशी देखील घोषणा केली. याबाबत बोलताना राणी बोभाटे यांनी सांगितलं की, ''स्त्री ही ना सासरची असते ना माहेरची. एका स्त्रीचं जगणं काय असतं हे शब्दात मांडता येणार नाही. त्यामुळे सरकारने महिलांसाठी घरांची विशेष तरतूद केल्यामुळे त्यांना स्वतःचं हक्काचं छप्पर मिळणार आहे. मुंबईसारख्या शहरात महिला काम करतात. आपलं घर सांभाळतात. अनेक जबाबदाऱ्या सांभाळत असतात. अशात त्या महिलेला स्वतःच्या हक्काचं छप्पर मिळाल्यास ती अधिक सक्षमपणे काम करू शकेल.''