कोल्हापूरCM Eknath Shinde: गेल्या दहा वर्षांत देशात कोणताही घोटाळा झाला नाही किंवा बॉम्बस्फोटही झाला नाही. हे सर्व पंतप्रधान मोदी यांची कमाल आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत कोल्हापूर आणि हातकणंगले मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांना विजयी करून पंतप्रधान मोदींचे हात बळकट करा, असं आवाहन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. कोल्हापुरातील हॉटेल पॅवेलियन येथे महायुतीच्या मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते.
2047चं व्हिजन मोदींकडे :2019 वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला विरोधी पक्ष म्हणूनसुद्धा संख्याबळ मिळालं नाही. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला आपला नेता निवडता आला नाही. त्यामुळे कणखर पंतप्रधान असलेल्या मोदींना आपलं मत देऊन देशाची प्रगती साधू असं आवाहन करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, रामटेक सह विदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभांना प्रचंड ऊन असतानाही झालेली गर्दी यांच्यावरचा विश्वास दृढ करत आहे. आता घरघर मोदी नाही तर मनमन मोदी अशी परिस्थिती राज्यात निर्माण झाली आहे. 2047 चा देश कसा असेल याचं व्हिजन पंतप्रधान मोदींकडे आहे. त्यामुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशाचं सर्वोच्च पद मिळण्यासाठी आपण प्रयत्न करूया, असं आवाहन यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी केलं. यावेळी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, भाजपा खासदार धनंजय महाडिक, महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक, धैर्यशील माने यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.